भडकलेल्या महागाईत सर्वसामान्यांची होरपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 07:41 PM2020-01-17T19:41:17+5:302020-01-17T19:43:08+5:30

घरगुती बजेट कोलमडले 

The general public's buoyancy in the rising inflation | भडकलेल्या महागाईत सर्वसामान्यांची होरपळ

भडकलेल्या महागाईत सर्वसामान्यांची होरपळ

googlenewsNext
ठळक मुद्देराजकारण्यांचे सत्तेकडेच लक्ष, भाववाढीकडे दुर्लक्ष मागील वर्षभरापासून महागाई बाजारपेठेत मुक्कामी 

औरंगाबाद : जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ झाली की, त्याचा थेट परिणाम, सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होत असतो. सध्या हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. महागाई एवढी भडकली आहे की, सर्वसामान्य होरपळून गेला आहे. एकीकडे उत्पन्न वाढत नाही; पण दुसरीकडे खर्च वाढला आहे. भाववाढीवर नियंत्रण ठेवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्या राजकारण्यांचे सत्ता टिकविण्यातच लक्ष असल्याने भाववाढीच्या विषयाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. 

करडी तेल २०० रुपये, सोयाबीन तेल १०० रुपये, सूर्यफुल तेल १०२ रुपये प्रतिलिटर, उडीदडाळ १०५ रुपये, मूगडाळ १०२ रुपये, गहू २७ रुपये, ज्वारी ४५ रुपये प्रतिकिलो हे भाव ऐकून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होत आहेत. शहरात भात खाऊन दिवस काढणाºयांची संख्याही कमी नाही. मात्र, तांदूळही कमीत कमी २८ रुपये किलोने मिळत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच करडी तेलाने २०० रुपयांचा उंबरठा गाठला आहे. गहू, ज्वारी व बाजरीच्या भावानेही यापूर्वीचे भाववाढीचे विक्रम मोडीत काढत नवीन उच्चांक गाठले आहे. 

मागील वर्षभरापासून महागाई बाजारपेठेत मुक्कामी आहे. त्यात मागील दोन महिन्यांतील भाववाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी ठरली आहे. सध्या बाजारात कांदा ४० ते ५० रुपये, तर बटाटा ३५ ते ४० रुपये किलो विकतो आहे. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट झालेच पाहिजे यात कोणतेही दुमत नाही. मात्र, याचा फायदा शेतकºयांऐवजी मधील दलालांच्या साखळीला होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाल होताना दिसत नाही. यामुळे भाववाढ थांबण्याचे नाव घेत नाही. देशातील तेलउद्योगांना उभारी देण्यासाठी व तेलबियांचे क्षेत्र वाढण्यासाठी केंद्र सरकारने क्रूड पामतेलाच्या आयातीवर निर्बंध आणले आहेत. परिणामी, पामतेलासह सर्व खाद्यतेलात तेजी आली आहे. मात्र, २०० रुपये प्रतिलिटरपर्यंत करडी तेल विक्री होणे किंवा सोयाबीन तेलाचे भाव १०० रुपयांपर्यंत जाणे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडणारे नाही. याचाही विचार सरकारने करावा, अशी प्रतिक्रिया जुन्या मोंढ्यात किराणा सामान खरेदीसाठी आलेल्या महिलांनी व्यक्त केली. 

खर्चाचा ताळमेळ लागेना 
रोजच्या जेवणात काय करावे, हा रोजचाच प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. त्यात सध्याच्या परिस्थितीत धान्य व तेलाच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य स्त्रीला तर ठरविलेल्या बजेटमध्ये घर चालविणे खूपच अवघड होऊन बसले आहे. कुठे काटकसर करावी व कु ठे खर्च यांचा ताळमेळ लागत नाही. तुटपुंज्या कमाईत सर्व खर्च भागविणे कठीण होते. बदलत्या काळात सोन्या-चांदीच्या भावाप्रमाणे धान्य आणि तेलाच्या किमतीकडेही लोकांचे लक्ष वेधले जात आहे. 
- प्राची कापसे


महागाईमुळे तारेवरची कसरत
सध्या बाजारपेठेत झालेल्या महागाईने गृहिणी अगदीच हवालदिल झाल्या आहेत. धान्य, डाळी, तेल, दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढलेल्या दरामुळे गृहिणींना घरखर्चाचा मेळ बसविण्यात तारेवरची कसरत करावी लागत आहे. पैशांची बचत कशी करावी, असा प्रश्न आज गृहिणींसमोर आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंमध्ये तरी बेसुमार भाववाढ व्हायला नको.
- यामिनी होले


महागाईचा तक्ता 

वस्तू    नोव्हेंबर २०१८  (किलो)    जानेवारी २०१९  (किलो)
गहू    २४.५० रुपये ते  ३८ रुपये    २६.५० रुपये ते ३५ रुपये
ज्वारी    ३५ रुपये ते ४० रुपये    ४५ ते ५५ रुपये 
बाजरी    २४ ते २६ रुपये    २६ ते ३० रुपये
तांदूळ    ३० ते ११० रुपये    २८ ते ११० रुपये 
हरभरा डाळ    ४५ ते ५६ रुपये    ५६ ते ५८ रुपये
तूर डाळ    ८४ ते ८६ रुपये    ७८ ते ८० रुपये
मूग डाळ    ७८ ते ८० रुपय    १०० ते १०२ रुपये
उडीद डाळ    ७८ ते ८० रुपये    ९८ ते १०५ रुपये
मसूर डाळ    ५० ते ६० रुपये    ६० ते ६८ रुपये  
मठ     ६० ते ६२ रुपये     ७४ ते ७६ रुपये
रवा    २८ ते ३० रुपये    ३२ ते ३४ रुपये
मैदा    २६ ते २८ रुपये    ३० ते ३२ रुपये
आटा    २८ ते ३० रुपये    ३२ ते ३४ रुपये
(पॅकिंगमधील खाद्यतेल, प्रतिलिटर)                    
करडी तेल    १६० ते १७० रुपये    १९५ ते २०० रुपये
सोयाबीन तेल    ७८ ते ८० रुपये    ९८ ते १०० रुपये
सूर्यफूल तेल    ८० ते ८५ रुपये    ९८ ते १०२ रुपये
पामतेल    ६८ ते ७२ रुपये    ९४ ते ९६  रुपये

Web Title: The general public's buoyancy in the rising inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.