दुष्काळात पाणी व्यवस्थापनाद्वारे अद्रक शेतीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 01:24 PM2018-12-29T13:24:04+5:302018-12-29T13:24:36+5:30
यशकथा : पारंपरिक शेतीस छेद देत आधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करीत शेती केली.
- सय्यदलाल ( औरंगाबाद)
दुष्काळाची तीव्रता वाढत असून, औरंगाबाद जिल्ह्यातील दरेगाव, ता. खुलताबाद येथील तुकाराम दादाराव गायकवाड हा तरुण शेतकरी अद्रक लागवडीतून लाखो रुपये नफा कमवीत आहे. दुष्काळातही पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून शेतीत यश मिळविणारे गायकवाड यांनी शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला.
दरेगाव येथील तुकाराम गायकवाड यांनी पारंपरिक शेतीस छेद देत आधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करीत शेती केली. अद्रक लागवड करण्यासाठी प्रथम जमिनीची चांगली मशागत केली. पाच फूट अंतराचे व दीड फूट उंचीचे बेड पाडले. नंतर या बेडमध्ये ठिंबक नळ्या अंथरल्या. प्रतिएकर मळीचे दोन व शेणखताचे दोन ट्रॅक्टर खत टाकला तसेच लागवडीपूर्वीच प्रतिएकर दोन गोणी १०-२६-२६ निंबोळी पेंड, सुपरफॉस्पेट दोन गोणी व एक गोणी पोटॅश बेडवर टाकून कालवून पसरविला. यानंतर जास्तीचे उत्पादन देणाऱ्या माहीम या अद्रक वाणाची निवड केली. त्यासाठी प्रतिएकर ८ क्विंटल बेणे ३ हजार ८५० या दराने खरेदी केले. १ जून ते ७ जूनदरम्यान बुरशीनाशक द्रावणात अद्रकचे बियाणे बुडवून बेडवर दोन्ही बाजूला नऊ इंच व दोन खड्ड्यातील अंतर ६ इंच ठेवून लागवड केली. ऋतुमानानुसार ठिंबकद्वारे पाणी सोडले.
तुकाराम गायकवाड व त्यांचे बंधू प्रतिवर्षी किमान सात ते दहा एकर क्षेत्रात अद्रक पीक घेतात. यात नांगरणी, कोळपणी, शेणखत व इतर खते, बेणे आदी एक लाख तीस हजार रुपये खर्च आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. सध्या अद्रक पिकास ५५०० ते ६००० पर्यंत मालाच्या प्रतवारीनुसार भाव सुरू असल्यामुळे लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण खर्च वजा जाता प्रतिएकरातून सहा लाखांवर निव्वळ नफा मिळणार असल्याचे तुकाराम गायकवाड यांनी सांगितले. अद्रक पिकास पाण्याची कमतरता पडू नये यासाठी त्यांनी दोन शेततळे निर्माण करून या शेततळ्यात पावसाळ्यात विहीर व नदी-नाल्याचे पाणी साठवले.
एका शेततळ्यात ६५ लाख लिटर याप्रमाणे दोन्हीही शेततळ्यात आजमितीस १ कोटी ३० लाख लिटर पाणीसाठा हा फक्त उन्हाळ्यात पिकांना पाणी देण्यासाठीच राखीव ठेवल्याने अडीच लाखांवरील नफा हा फक्त शेततळ्याच्या पाण्यामुळेच मिळत असल्याचे तुकाराम गायकवाड यांनी सांगितले. विहीर व शेततळे व यातील पाण्याचा अंदाज घेतल्यास डिसेंबर ते जानेवारीत काढणी केल्यास प्रतिएकर १०० ते ११० क्विंटल तर पाणी असल्यास हीच अद्रक जून ते जुलै महिन्यात काढणी केल्यास प्रतिएकर १५५ क्विंटलच्या वर हमखास उत्पादन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्या परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी शेततळ्यांची निर्मिती केली आहे. यामुळे त्यांनासुद्धा दुष्काळाचे चटके सहन करावे लागले नाहीत. ते शेततळ्याच्या माध्यमातून शेतीत विविध उत्पन्न काढत असल्याचेही गायकवाड म्हणाले. पाण्याचे योग्य नियोजन केले तर शेती यशस्वी ठरते याचे उदाहरण तुकाराम गायकवाड यांनी घालून दिले आहे.