२० गुंठ्यात हजारोंचे उत्पन्न
By Admin | Published: October 18, 2014 11:56 PM2014-10-18T23:56:15+5:302014-10-19T00:20:28+5:30
संजय सोळुंके , तळेगाव २० गुंठे क्षेत्रातील कपाशीच्या पिकात टोमॅटो आणि मेथीची लागवड करुन हजारोंचे उत्पन्न मिळविण्याची किमया भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते येथील शेतकऱ्याने साधली आहे.
संजय सोळुंके , तळेगाव
२० गुंठे क्षेत्रातील कपाशीच्या पिकात टोमॅटो आणि मेथीची लागवड करुन हजारोंचे उत्पन्न मिळविण्याची किमया भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते येथील शेतकऱ्याने साधली आहे.
पिंपळगाव येथील शेतकरी दीपक सांडू सोळंके यांनी अडीअडचणींवर मात करुन कपाशीमध्ये मेथी या भाजीची लागवड केली. यावर्षी कमी पावसामुळे कपाशी पिकाची वाढ झाली नाही. त्यामुळे या तरुण शेतकऱ्याने तुषारच्या मदतीने कपाशीच्या पट्ट्यांमध्ये मेथी शिंपडून मेथीच्या भाजीचे भरघोस उत्पन्न मिळविले आहे. मेथीच्या भाजीला औरंगाबादहून मागणी होत आहे. केवळ २० गुंठ्यात जवळपास ४० ते ५० हजारांचे उत्पन्न मिळाल्याचे सोळंके यांनी सांगितले.
तसेच पाच गुंठ्यात टोमॅटोचे पीक घेऊन सोळंके यांनी आर्थिक सुबत्ता साधली आहे. टोमॅटोला सुध्दा चांगली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. या भागातील वज्रखेडा, सावखेड पिंप्री या गावातून दररोज हजारो रुपयांचा माल थेट औरंगाबादच्या बाजारपेठेत जात असल्याने अनेकांना त्याचा मोठा फायता होत आहे.
विशेष म्हणजे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन न घेता या शेतकऱ्यांनी ही किमया घडविली आहे. पारंपारिक पिकावर अवलंबून न राहता त्याला मेथी, टोमॅटो यासारख्या पिकांची जोड दिली असता आर्थिक सुबत्ता नांदू शकते, हेच या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.
परिसरातील बहुतांशी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पिकांना फाटा देत नव नवीन नगदी पिकांना प्राधान्य दिले आहे. आधुनिक शेतीची कास धरीत आपले उत्पन्न वाढविले आहे. आधुनिक व तांत्रिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून परिपूर्ण मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.