शेतकऱ्याने दोन हजार रुपये दिले तरच होते जिओ टॅगिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:04 AM2021-07-24T04:04:11+5:302021-07-24T04:04:11+5:30

औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यात तांत्रिक अधिकारी शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. रोजगार हमी योजनेतून वृक्ष, फळबाग लागवडीच्या योजनेत कार्यारंभ आदेश ...

Geo tagging was only possible if the farmer paid two thousand rupees | शेतकऱ्याने दोन हजार रुपये दिले तरच होते जिओ टॅगिंग

शेतकऱ्याने दोन हजार रुपये दिले तरच होते जिओ टॅगिंग

googlenewsNext

औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यात तांत्रिक अधिकारी शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. रोजगार हमी योजनेतून वृक्ष, फळबाग लागवडीच्या योजनेत कार्यारंभ आदेश निघून जिओ टॅगिंग होत नाही. दोन हजार रुपये दिल्याशिवाय तांत्रिक अधिकारी टॅगिंग करून देत नसल्याचा धक्कादायक प्रकार खुद्द शिवसेनेचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सभापती किशोर बलांडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मांडला. यावेळी फुलंब्रीचे गटविकास अधिकारी व तांत्रिक अधिकाऱ्यांवर कारवाईची सर्व सदस्यांनी मागणी केली.

जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पंचायत समिती औरंगाबादच्या सभागृहात स्थायी समितीची बैठक पार पडली. शिवसेनेच्या सभापतींनीच आक्रमकपणे रोहयोतील योजनांच्या अंमलबजावणीतील अडवणूक आणि बोकाळलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्याने उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, सदस्य शिवाजी पाथ्रीकर, मधुकर वालतुरे, किशोर पवार, रमेश गायकवाड, रमेश पवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील अडवणुकीचे प्रकार नावासह मांडले.

फुलंब्री तालुक्यातील कंत्राटी तांत्रिक अधिकारी खंदारे आणि गटविकास अधिकारी विलास गंगावणे यांच्याकडे वारंवार सांगूनही शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला नाही. वृक्षलागवडीसाठी पेंडगाव येथील शेतकऱ्यांना २६ जूनला कार्यारंभ आदेश मिळाले. अद्याप जिओ टॅगिंग न झाल्याने पावसाळा सुरू होऊन महिना सरला तरी फळबाग लागवड करता आली नाही. खड्ड्यांचे जिओ टॅगिंग करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार रुपये द्यावे लागतात. न दिलेल्या शेतकऱ्यांचे टॅगिंग अद्याप झालेले नाही. यासंबंधी जाब विचारल्यावर थेट वरपर्यंत पैसे द्यावे लागत असल्याचे अधिकारी सांगत असतील तर कसे होईल, असा उद्विग्न सवाल बलांडे यांनी उपस्थित केला.

---

आजच कारवाई करणार

फुलंब्रीच्या त्या संबंधित अधिकाऱ्यांवर आजच कारवाई होईल. याप्रकरणी सर्व आरोपांची चौकशी करून कारवाई करू तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोहयोचा कामनिहाय आढावा घेऊन कामाला गती देऊ, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी दिली.

----

खडाजंगी...

---

(पाॅईंटर)

कंत्राटी तांत्रिक अधिकारी : वरपर्यंत पैसे द्यावे लागतात. सभापतींना सांगा वरपर्यंत लाईन क्लिअर, २ हजार दिल्यावरच होईल काम

बांधकाम सभापती : रोहयो मंत्री याच जिल्ह्याचे, शिवसेनेचे मंत्री, राज्यात, जिल्हा परिषदेतही शिवेसेना सत्तेत, सचिव योजनेसाठी आग्रही, मग पैसे वर पर्यंत म्हणजे कुणा कुणाला द्यावे लागतात. बीडीओंसह कंत्राटी अधिकार्यांवर कारवाई करा.

सर्व सदस्य : पैसे दिले नाही म्हणून मस्टर केले झिरो. अखेर शेतकर्यांनी वृक्ष लागवड केली. आता खड्ड्यांचे जीओ टॅगिंग कसे होईल. शेतकरी कलम आणल्यावर पावसाळा सुरु झाल्यावर थांबणार कसे?

बीडीओ : तांत्रिक अधिकारी वर पर्यंत पैसे द्यावे लागत असल्याचे माझ्यासमोर बोलले. मी चौकशी करुन समज दिली.

Web Title: Geo tagging was only possible if the farmer paid two thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.