परीक्षा केंद्र मिळविण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:04 AM2021-01-16T04:04:52+5:302021-01-16T04:04:52+5:30
शिक्षण : बोर्डात परीक्षेच्या तयारीची लगबग औरंगाबाद : दहावी आणि बारावीच्या आगामी होणाऱ्या परीक्षांसाठी ४० शाळांनी परीक्षा केंद्राची मागणी ...
शिक्षण : बोर्डात परीक्षेच्या तयारीची लगबग
औरंगाबाद : दहावी आणि बारावीच्या आगामी होणाऱ्या परीक्षांसाठी ४० शाळांनी परीक्षा केंद्राची मागणी केली आहे. त्यासंदर्भात ४० प्रस्ताव बोर्डाकडे दाखल झाल्याची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाच्या विभागीय मंडळाकडून देण्यात आली.
कोरोनामुळे शाळा बंद राहिल्याने आणि अद्यापही नव्या शैक्षणिक सत्रांची स्पष्टता शिक्षण विभागाकडून झालेली नाही. दरवर्षी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्चदरम्यान होतात. मात्र, यंदा या परीक्षा एप्रिल- मेदरम्यान होण्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकारी व्यक्त करत आहेत. तरीही अभ्यासक्रम कपातीसंदर्भातील संभ्रम कायम आहे. तसेच बोर्डाकडून १०० टक्के अभ्यासक्रमावर प्रश्नसंच निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनासंदर्भातच्या दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करीत परीक्षा घेण्याचे नियोजन राज्य मंडळाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी जास्त परीक्षा केंद्रांची व सुविधांची आवश्यकता भासणार आहे. गेल्यावर्षी दहावीची अडीचशेहून अधिक, तर बारावीची साडेतीनशेच्या जवळपास परीक्षा केंद्रे जिल्ह्यात होती. यावर्षी त्यात भर पडणार आहे. नव्याने ४० शाळांकडून परीक्षा केंद्राची मागणी झालेली आहे. यासाठी शाळेतील दहावी व बारावीचे वर्ग सलग ३ वर्षे सुरू असणे गरजेचे असते. याशिवाय दाखल प्रस्तावांपैकी त्या शाळेतील जागेची पाहणी करणे, इमारत, सुरक्षितता, आसन व्यवस्था, क्षमता या निकषांच्या विचाराअंती परीक्षा केंद्रांना परवानगी दिली जाईल, असे बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितले.