उठा पांडुरंग आता दर्शन द्या सकळा
By | Published: December 2, 2020 04:09 AM2020-12-02T04:09:28+5:302020-12-02T04:09:28+5:30
केऱ्हाळा : अश्विन पौर्णिमा ते कार्तिक शुध्द पौर्णिमा या पवित्र महिन्यात कार्तिक चतुर्दशीच्या मध्यरात्री विष्णू पूजनानंतर अरुणोदय पूजन केल्यास ...
केऱ्हाळा : अश्विन पौर्णिमा ते कार्तिक शुध्द पौर्णिमा या पवित्र महिन्यात कार्तिक चतुर्दशीच्या मध्यरात्री विष्णू पूजनानंतर अरुणोदय पूजन केल्यास कार्तिक स्वामीचे दर्शन घडते. कार्तिक स्नान करुन सूर्योदयाअगोदर स्नान केले तर विष्णू भगवंताची भेटप्राप्ती होते. यासह कार्तिक समाप्तीला सातशे पन्नास दिव्यांच्या प्रकाशमय वाती लावल्यास चातुर्मास केल्याची पुण्यप्राप्ती होते, असे गीताभागवतेत म्हटले आहे. त्यामुळे केऱ्हाळ्यात शेकडो भाविक मनोभावे माऊली, पांडुरंगाचा नाम-जप करीत असल्याचे चित्र सकाळी दिसून येते.
या धार्मिक विधीवत पूजेची परंपरा सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथे पंधरा वर्षांपासून सुरू आहे. प्रारंभी या सोहळ्याची सुरुवात पाच भाविकांपासून झाली होती. परंतु, आज दोनशे भाविक यात सहभागी होत आहेत. वाढत्या भाविकांच्या उत्साहामुळे केऱ्हाळानगरीत सकाळी पांडुरंगाच्या गजराने परिसर दणाणून जात आहे. या कार्तिक काकड्याच्या सोहळ्यात गावातील बालगोपाळ, महिला मंडळासह पुरुष भाविकांची रेलचेल बघायला मिळते. या सोहळ्यात सकाळी चारला काकडा भजनास मारुती मंदिर व विठ्ठल रुख्मिणी मंदिरातून सुरुवात होते. पाच वाजता विठ्ठल- रुख्मिणी व महारुद्र हनुमानास पंचअमृत स्नान करुन अभिषेक केला जातो. सहा वाजता दोनशेपेक्षा अधिक वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलीच्या पालखीचे गावातून काकडा भजन, आरती, भारुडे, भक्तिगीते गात मिरवणूक काढण्यात येते.
पालखी मिरवणुकीच्या स्वागतासाठी गावातील महिला आपल्या घरासमोर सडा,रांगोळी काढून आलेल्या पालखीचे पूजन करुन स्वागत करतात. यानंतर त्यासुद्धा या पालखी मिरवणुकीत आपला सहभाग नोंदवितात. मिरवणूक संपल्यावर सर्व भाविकांसाठी ग्रामस्थांकडून विविध प्रकारच्या महाप्रसादाचे आयोजन असते. या सोहळ्याच्या समाप्तीस तालुक्यातील साधू, संत व महंत, वारकरी, महाराज हजेरी लावून सोहळ्याचा आनंद घेतात. या सोहळ्यात गावातील शकडो नागरिक सहभागी होऊन नतमस्तक होत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
--- कॅप्शन : केऱ्हाळ्यात भक्तिमय वातावरणात सकाळी गावातून माऊलीच्या पालखीची मिरवणूक काढून काकडा, भजन, भारुडे गाताना भाविक.