पादचारी पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:05 AM2021-04-24T04:05:31+5:302021-04-24T04:05:31+5:30
औरंगाबाद : शहरात सुरू असलेल्या पादचारी पुलांचे काम लवकर पूर्णत्वास नेण्याचा आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित यंत्रणेला दिला. ...
औरंगाबाद : शहरात सुरू असलेल्या पादचारी पुलांचे काम लवकर पूर्णत्वास नेण्याचा आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित यंत्रणेला दिला. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी कामाची पाहणी केली.
पहिल्या पादचारी पुलाचे काम जिल्हा न्यायालयासमोर सुरू आहे, तर उर्वरित दोन ठिकाणी म्हणजेच एस.एफ.एस. शाळेसमोर आणि मुकुंदवाडी येथील बसस्टॉपसमोर (एस टाइप स्काय वॉक), अशा दोन ठिकाणी लवकरच काम चालू करण्यात येणार आहे. याशिवाय चिकलठाणा येथील विमानतळासमोर ४५ मीटरचा उड्डाणपूल तयार करण्याचे काम येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येत आहे.
शहरात तीन ठिकाणी पादचारी पूल (एस टाइप स्काय वॉक) तयार करण्यात येणार आहेत. पाहणी करताना नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर महेश पाटील, सृष्टी कॉन्टॅक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या सी.एस.ओ. स्मिता शुक्ला, अशोक ससाणे, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांची उपस्थिती होती.
साडेसहा किलोमीटरपर्यंत पेव्हर ब्लॉकचे काम
नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत सृष्टी कॉन्टॅक्ट प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद यांना हस्तांतरित केले असून, याअंतर्गत केम्ब्रिज चौकापासून ते नगर नाक्यापर्यंत एकूण १४ कि.मी. लांबीचे रस्त्याच्या दोन्ही बाजूस आर.सी.सी. ड्रेन काम तयार करण्यात आले आहे. ड्रेनपासून ते रत्याच्या कडेपर्यंत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले असून, सध्या हे काम साडेसहा कि.मी.पर्यंत पूर्ण झाले असल्याचे पाटील यांनी सांगितले.