वेळेत उपचार घ्या; घाटी रुग्णालयात कोरोनाचे ८० टक्के रुग्ण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 12:33 PM2020-09-16T12:33:50+5:302020-09-16T12:46:21+5:30
वेळेत उपचार घेण्याकडे रुग्णांनी केलेल्या दुर्लक्षाचे गंभीर परिणाम
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाचे स्वरूप दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वेळीच उपचार घेण्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकृती गंभीर आणि अतिगंभीर होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. एकट्या घाटीत कोरोनाचे ८० टक्के रुग्ण हे स्टेज-४ आणि स्टेज-५ मधील आहेत. यात स्टेज-५ मधील रुग्णांना वाचविण्याचे आव्हान डॉक्टरांपुढे उभे आहे.
सामान्य व्यक्तीच्या शरीरात ९५ ते ९९ टक्के ऑक्सिजन असतो. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा कमी झाले, तर व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास सुरू होतो. कोरोना प्रादुर्भावाच्या गेल्या ६ महिन्यांत कोरोनाची लागण झालेले, मात्र कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण सुमारे ८० टक्के होते; परंतु आता परिस्थिती उलट झाली आहे. गंभीर स्वरूपातील रुग्णांचे प्रमाण सध्या अधिक आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला उपचारासाठी कसरत करावी लागत आहे. घाटी रुग्णालयात कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. यात अनेक गंभीर रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यात डॉक्टर यशस्वीही होत आहेत. मात्र, कोरोनाच्या अतिगंभीर रुग्णांच्या मृत्यूच्या वाढत्या प्रमाणाविषयी चिंता व्यक्त होत आहे.
अडीच हजारांवर रुग्णांवर उपचार
घाटीत गंभीर रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मंगळवारी दुपारपर्यंत तब्बल ३५१ रुग्ण दाखल होते, तर १४ सप्टेंबरपर्यंत एकूण २ हजार ५६४ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत, तर १ हजार ४१८ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
ऑक्सिजन ४० टक्के, तरीही यश
घाटीत दाखल झालेल्या एका रुग्णाची आॅक्सिजन पातळी ४० टक्क्यांपर्यंत खाली आली होती. हा रुग्ण १५ दिवस व्हेंटिलेटरवर होता. उपचारामुळे त्याचे व्हेंटिलेटर काढण्यात यश आल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.
कोरोनाचे डॉक्टरांनी सांगितलेले ५ टप्पे
स्टेज-१ मधील रुग्ण म्हणजे ज्यांना लागण झाली तरी कोणतीही लक्षणे नाहीत.
स्टेज-२ मधील रुग्णांत थोडासा ताप; पण आॅक्सिजनची पातळी सामान्य अशी अवस्था असते.
स्टेज-३ मध्ये रुग्णांची प्रकृती मध्यम स्वरूपाची असते. या स्टेजमध्ये २-अ प्रकारात रुग्णांची आॅक्सिजन पातळी ही ९४ ते ९७ टक्क्यांदरम्यान असते, तर २-ब प्रकारात आॅक्सिजनची पातळी ही ९० ते ९४ टक्के असते.
स्टेज-४ मध्ये आॅक्सिजन पातळी ९० ते ८८ टक्क्यांदरम्यान असते. त्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर होते.
स्टेज-५ मध्ये आॅक्सिजनची पातळी ८८ टक्क्यांपेक्षा अधिक खाली जाते. त्यामुळे रुग्ण अतिगंभीर अवस्थेत जातो.
लिक्विड ऑक्सिजन संपेपर्यंत त्याकडे कोणाचेही लक्ष गेलेच नाहीhttps://t.co/4j7E4VCOiP
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 16, 2020
आजार लपवू नका
कोरोना विषाणू आणि या आजाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही; परंतु अनेक जण आजार अंगावर काढून उपचारासाठी उशिराने दाखल होतात; परंतु कोणत्याही परिस्थिती आजार लपविता कामा नये. वेळीच उपचार घेतले पाहिजेत.
-डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक
२०% रुग्णांत आॅक्सिजन ९०% वर
ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यांतून केवळ आॅक्सिजनची गरज असलेले रुग्णही घाटीत येत आहेत. केवळ १५ ते २० टक्के रुग्ण ९० टक्क्यांवर आॅक्सिजन पातळी असलेले रुग्ण दिसून आले. उर्वरित रुग्ण हे स्टेज-४, स्टे-५ मधील आहेत. गंभीर रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण लवकर रुग्णालयात आल्यास गंभीर रुग्णास आॅक्सिजन लवकर देता येतो. गंभीर रुग्णासाठी आॅक्सिजन अधिक फायदेशीर आहे.
- डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसिन विभागप्रमुख, घाटी.
या नहरींवर अनेक ठिकाणी शेतकरी व नागरिकांनी अतिक्रमणे केलेली आहेत.https://t.co/e8ZJVseJNC
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 16, 2020