वाहनाचे लायसन्स काढायचे,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:02 AM2021-06-10T04:02:02+5:302021-06-10T04:02:02+5:30
मग अपॉइंटमेंट घेतलीय का? ‘आरटीओ’चे कामकाज सुरू : लायसन्सच्या नूतनीकरणासाठी अपॉइंटमेंटची गरज नाही औरंगाबाद : कोरोनामुळे गेली अनेक ...
मग अपॉइंटमेंट घेतलीय का?
‘आरटीओ’चे कामकाज सुरू : लायसन्सच्या नूतनीकरणासाठी अपॉइंटमेंटची गरज नाही
औरंगाबाद : कोरोनामुळे गेली अनेक दिवस आरटीओ कार्यालयाचे कामकाज ठप्प होते. परिणामी, लायसन्सची मुदत संपूनही अनेकांना नूतनीकरण करता आले नाही, तर अनेकांना लर्निंग आणि पर्मनंट लायसन्स काढता आले नाही. शहरातील निर्बंध हटले आणि आरटीओ कार्यालयातील कामकाज पुन्हा एकदा गतिमान झाले आहे.
आरटीओ कार्यालयाचे कामकाज ७ जूनपासून पुन्हा एकदा सुरु झाले आहे. कोरोनामुळे कामकाज बंद असल्याने अनेक वाहन परवान्यांची मुदत संपली आहे. मात्र मुदत संपलेल्यांना वाहन परवान्यांची मुदत ३० जूनपर्यंत वाढवून दिलेली आहे. लायसन्सच्या नूतनीकरणासाठी अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही. त्यासाठी केवळ ऑनलाईन अर्ज करावा लागेल, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांत १०० लर्निंग लायसन्स आणि ५० पर्मनंट लायसन्स दिल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयात विविध खबरदारी घेतली आहे.
------
अशी घ्या अपॉइंटमेंट
लर्निंग आणि पर्मनंट लायसन्सची चाचणी देण्यासाठी ऑनलाईन अर्ज करून अपॉइंटमेंट घ्यावी लागते. वाहनचालक आपल्या साेयीची तारीख निवडून त्या दिवशी चाचणी देऊ शकतो. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी, अपॉइंटमेंट घेण्यासाठी https://parivahan.gov.in या पोर्टलवर ‘सारथी’वर क्लिक करावे. यावर सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर लर्निंग लायसन्ससाठी माॅक टेस्टही उपलब्ध आहे.
----
असा आहे कोटा
लर्निंग लायसन्ससाठी रोज १०० शिकाऊ वाहनचालकांना चाचणीसाठी अपॉइंटमेंट दिली जात आहे. पर्मनंट लायसन्ससाठी १२८ अपॉइंटमेंट देण्यात येत आहे. यात दुचाकीसाठी ५०, चारचाकी ‘एलएमव्ही’साठी ४०, ‘एलएमव्ही टीआर’साठी १०, अवजड वाहन परवान्यासाठी १० आणि इतर वाहनांसाठी १८ अपॉइंटमेंट देण्यात येत आहेत. वाहन परवान्याचा कोटा क्लासच्या मागणीनुसार ठरवण्यात आला आहे. दुचाकी आणि चारचाकी एलएमव्ही लायसन्स काढणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या दोन्हींचा कोटा अधिक आहे. टप्प्याटप्प्यात अपॉइंटमेंटमध्ये वाढ केली जाणार आहे.
-----
पहिल्या दोन दिवसांत
७२ वाहनांची नोंदणी
गेल्या दीड महिन्यांत आरटीओ कार्यालयात एकाही नव्या वाहनाची नोंद झाली नव्हती. परंतु शहर अनलाॅक झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत आरटीओ कार्यालयात ७२ नव्या वाहनांची नोंदणी झाली, अशी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली.
---
प्रतिसाद पाहून कोटा वाढविणार
पर्मनंट लायसन्ससाठी कोटा पद्धत करण्यात आली आहे. त्यानुसार ज्या संवर्गातील लायसन्स काढण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यासाठी अधिक कोटा ठेवण्यात आला आहे. वाहनचालकांचा प्रतिसाद वाढल्यानंतर अपॉइंटमेंटचा कोटा वाढविण्यात येईल. संकेतस्थळावर लर्निंग लायसन्सच्या दृष्टीने माॅक टेस्टची सुविधा आहे. त्याद्वारे सराव करता येतो.
- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी
------
फोटो ओळ..
औरंगाबाद शहर अनलाॅक होताच आरटीओ कार्यालयात पुन्हा एकदा वाहनधारकांची वर्दळ सुरु झाली आहे.