‘ऊठ गुरवा, जागा हो! संघर्षाचा धागा हो!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:07 AM2018-06-07T00:07:43+5:302018-06-07T00:09:29+5:30
‘गुरव समाजाचा समावेश एसबीसीत झालाच पाहिजे, जातिवाचक शिवीगाळ करून होणारा अपमान थांबलाच पाहिजे, दानपेटी, मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर काढून गुरव पुजा-यांना उत्पन्न मिळू दिलेच पाहिजे.’ या व यासारख्या अनेक घोषणांनी बुधवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालय परिसर दणाणून गेला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘ऊठ गुरवा, जागा हो! संघर्षाचा धागा हो!’, ‘देवस्थान जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची.’ ‘गुरव समाजाचा समावेश एसबीसीत झालाच पाहिजे, जातिवाचक शिवीगाळ करून होणारा अपमान थांबलाच पाहिजे, दानपेटी, मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर काढून गुरव पुजा-यांना उत्पन्न मिळू दिलेच पाहिजे.’ या व यासारख्या अनेक घोषणांनी बुधवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालय परिसर दणाणून गेला होता.
औरंगाबाद जिल्हा गुरव समाज मंडळ, महिला मंडळ व युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही जोरदार निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. नंतर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना भेटून मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
प्रश्न ऐकून घेतले
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी शिष्टमंडळात आलेल्या, विशेषत: ग्रामीण भागातून आलेल्या गुरव समाजबांधवांचे प्रश्न सहानुभूतिपूर्वक ऐकून घेतले. अनेकांनी त्यांच्या-त्यांच्या प्रश्नांसंदर्भातील कागदपत्रेही भापकर यांना सादर केली. यात बिडकीनचे शरद काळे, पिशोरचे बाबूराव खरे, कडेठाण मंदिराचे चंद्रकांत धुमाळ महाराज व रविकांत साळुंके, नेर, जि. जालनाचे विश्वंभर भाले, अंभईचे रमेश शिंदे, रामेश्वर मंदिराचे सुधीर छत्रपती, राजू वाघमारे, मौजपुरी, जि. जालनाचे विठ्ठल दावलकर, चनेगावचे हरिभाऊ सोनवणे, बाबºयाचे दिलीप सोनवणे, बजाजनगरच्या वैशाली गुरव, नागेश्वर मंदिराच्या सरला मुंगीकर, सिल्लोडचे अंबादास बचाटे, चिंचोलीचे अशोक गजभार, घाटनांद्रा येथील बाळू वाघ यांनी आपापले प्रश्न विभागाीय आयुक्तांसमोर मांडले व त्यांनी ते आपुलकीने ऐकून घेतले.
निदर्शकांच्या हातात घोषवाक्यांचे फलक होते. ‘जय काशीबा... जय मंडल’, ‘जय संविधान, जय विज्ञान, हम सब एक है, एक ओबीसी... करोड ओबीसी’ असा मजकूर या फलकांवर लिहिलेला होता. मंडळाचे पदाधिकारी रोहिणी शेवाळे, रामनाथ कापसे, कविता कापसे, दत्ता गुरव, वैभव भंडारे, सुरेखा तोरणमल आदींनी या निदर्शनाचे नेतृत्व केले. सोमनाथ पवार, लक्ष्मणराव गजभार, सर्वेश्वर वाघमारे, प्रकाश उगारे, हिंदूराव गुरव, आबा काळे, पद्माकर पालोदकर, जगदीश आचार्य, रमेश भंडारे, मीना साळुंके, मीना मुंगीकर, सुवर्णा धानोरकर, सुभाष मुंगीकर, अजिंक्य आगलावे, सुनील दांडगे आदींनी या निदर्शनात सहभाग घेतला.