'गॅस एजन्सी मिळवून देतो', ५६ लाखांना गंडवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 11:30 AM2020-11-02T11:30:23+5:302020-11-02T11:31:47+5:30

सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी

'Gets gas agency', inter-state gang busting Rs 56 lakh exposed | 'गॅस एजन्सी मिळवून देतो', ५६ लाखांना गंडवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

'गॅस एजन्सी मिळवून देतो', ५६ लाखांना गंडवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

googlenewsNext
ठळक मुद्देसांगोल्यात दोघे अटकेत देशभरात हे रॅकेट सक्रिय

औरंगाबाद : गॅस एजन्सी मिळवून देतो, अशी थाप मारून वाळूज येथील एका व्यावसायिकास ५६ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या दोघा जणांना सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांंनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे अटक केली. 

काळू शेख मोहम्मद शेख (३६) व मोहम्मद अवसान रजा (२८, दोघेही ह.मु. सांगोला, जि. सोलापूर, मूळ रा. साहेबगंज, झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या माध्यमातून सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागरिकांना थाप मारून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीमध्ये अनेक सदस्य सक्रिय असून, सदरील आरोपींच्या अन्य साथीदारांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांचे एक पथक उद्या झारखंडकडे रवाना होणार आहे. 

झाले असे की, वाळूज येथील रहिवासी चांगदेव सोमीनाथ तांदळे (४९) यांची रविकिरण एन्टरप्राईज यांची ही संस्था असून, ते या माध्यमातून इंडस्ट्रीयल सप्लायचा व्यवसाय करतात. वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीनुसार तांदळे यांनी जळगाव येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन कार्यालयात जाऊन पंढरपूर (वाळूज) येथे गॅस एजन्सीसाठी २८ ऑगस्ट २०१९ रोजी अर्ज केला. त्यानंतर २१ जानेवारी २०२० रोजी त्यांनी याच कार्यालयात मुलाखत दिली. तेव्हा दुसऱ्या क्रमांकावर त्यांची निवड झाली. त्यानंतर ५ मे २०२० रोजी संदीप पांडे या नावाच्या व्यक्तीने तांदळे यांना फोन करून गॅस एजन्सीसाठी कागदपत्रे व फोटो मेलवरून मागवून घेतला. गॅस एजन्सी मिळवून देण्यासाठी त्याने तांदळेंना ५६ लाख ६६ हजार खर्च येईल, असे सांगून या खर्चाचे विवरणही समजावून सांगितले.

पांडे याने तांदळे यांना सतत संपर्क साधून विश्वास संपादन केला. त्यामुळे पांडे याने दिलेल्या बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, इंड्सइंड  बँक व कॉर्पोरेशन बँक खात्यावर तांदळे यांनी ६ मे ते ७ ऑगस्टपर्यंत तब्बल ५६ लाख ६१ हजार ७०० रुपये जमा केले. काही दिवसांंनी तांदळे यांना शंंका आल्यामुळे त्यांनी जळगाव येथील कार्यालयाशी संपर्क साधून पांडे यांच्याबाबत विचारपूस केली. तेव्हा पांडे नावाचा कोणीही कर्मचारी आमच्या कार्यालयात नसल्याचे सांगण्यात आले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे तांदळे यांच्या लक्षात आले. त्यांनी थेट सायबर गुन्हे शाखा गाठून आपबिती कथन केली व तक्रार दाखल केली. 

देशभरात हे रॅकेट सक्रिय
यासंदर्भात पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी सांगितले की, केरळ आणि कर्नाटकमध्येही या आरोपींनी अनेकांची फसवणूक केली असून, तांदळे यांनी जमा केलेल्या बँक खात्यांचे नंबरही तेच आहेत. देशभरात हे रॅकेट सक्रिय असून, टोळीत अनेक सदस्य असण्याची शक्यता आहे. काळू व मोहम्मद हे पूर्वी वाशी मार्केटमध्ये (नवी मुंबई) हमाली करायचे. आता ते शेतकऱ्यांकडून डाळिंब घेऊन ते व्यापाऱ्यांना देण्याचा दलालीचा धंदा करीत आहेत. सध्या तीन महिन्यांपासून सांगोल्यात डाळिंबाच्या व्यवसायासाठी किरायाने राहत होते. फसवणूक केलेल्या पैसा ते या व्यवसायात वापरतात..

Web Title: 'Gets gas agency', inter-state gang busting Rs 56 lakh exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.