वाळूज-कमळापूर रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:43 PM2019-02-04T22:43:32+5:302019-02-04T22:44:08+5:30
या रस्त्याचे तात्काळ काम सुरू करण्यात यावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे सोमवारी दिला आहे.
वाळूज महानगर : वाळूज-कमळापूर या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर असतानाही प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्यामुळे नागरिक वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याचे तात्काळ काम सुरू करण्यात यावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे सोमवारी दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाला ढोरेगाव, सावखेडा, वाळूज, कमळापूर या रस्त्याच्या कामाला वर्षभरापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या रस्त्याच्या कामासाठी जवळपास ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, ई-निविदा काढण्यात आलेली आहे. या रस्त्याचे काम मे. व्ही.टी. पाटील इंजिनिअर्स अॅण्ड कॉन्ट्रॅक्टर्स यांना मिळाले आहे. मात्र, रस्त्याचे काम सुरू करण्यास संबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते चालढकल करीत असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.
सद्य:स्थितीत या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाºया दुचाकीस्वार व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाळूज परिसरातील कामगारांना पंढरपूरमार्गे वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे कामगारांचा वेळही वाया जात असून, वाढीव इंधनाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, यासाठी नागरिक सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्षभरापासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र, याकडे अधिकारी कानाडोळा करीत असल्याने रविवारी वाळूज येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांची बैठक झाली. बैठकीत सर्जेराव भोंड, रतन अंबिलवादे, नामदेव इले, अनिल सोनवणे, सुलेमान शेख, श्रीराम बोचरे, पुरुषोत्तम हाडोळे, विश्वनाथ थोरात, सौरभ दरेकर, रणजित कोळगे आदींसह नागरिकांनी १४ फेबु्रवारीला वाळूजला रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला.
जीएसटीचे कारण
या रस्त्याचे काम मे. व्ही.टी. पाटील या ठेकेदाराला देण्यात आले आहे. दरम्यान, जीएसटीमुळे या रस्त्याचे काम लांबणीवर पडले होते. वर्कआॅर्डर पूर्ण होताच तात्काळ या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
- एच.के. ठाकूर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, गंगापूर