घाडगे दाम्पत्य हत्येचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:00 AM2017-09-01T01:00:52+5:302017-09-01T01:00:52+5:30
गेवराईतील घाडगे दाम्पत्य हत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. ते पेलत आठवड्यातच तिन्ही आरोपींना जेरबंद करीत या प्रकरणाचा पर्दाफाश केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : गेवराईतील घाडगे दाम्पत्य हत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. ते पेलत आठवड्यातच तिन्ही आरोपींना जेरबंद करीत या प्रकरणाचा पर्दाफाश केला.
आदिनाथ घाडगे व अलका घाडगे या दाम्पत्याची हत्या करून त्यांच्या विवाहित मुलीवर धारदार शस्त्राने हल्ला करीत गंभीर जखमी केल्याची घटना २३ आॅगस्ट रोजी गेवराईतील गणेशनगर भागात घडली होती. चोरांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून सण-उत्सव काळात हा गंभीर गुन्हा केल्याने तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी घटनास्थळी भेट देऊन आठ पथकांची नेमणूक केली. या पथकांनी जालना, परभणी, अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर असे शेजारचे सर्व जिल्हे पिंजून काढले. त्यांना परजिल्ह्यातील गुन्हेगारांनी हा प्रकार केला नसल्याचे लक्षात आले. हे आरोपी गेवराईतीलच असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शहरासह तालुक्यातील सर्व गुन्हेगारांची तपासणी केली. त्यात त्यांना सोम्या शेºया भोसले (१९), वाघ्या शेºया भोसले (२२, रा. गेवराई) व लख्या भोसले (१८, रा. घोडा कवडगाव, ता. परळी) यांच्यावर संशय बळावला. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा शोध घेतला; परंतु ते आढळून आले नाहीत.
दरम्यान, सोमवारी रात्री एकच्या सुमारास गेवराई शहरातीलच बसस्थानकाजवळ सोम्या एका हॉटेलमध्ये दारू पीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पत्रकार परिषद घेऊन सोम्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगितले. सोम्याला इतर दोघांनी साथ दिल्याचे श्रीधर म्हणाले होते. त्यांचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
बुधवारी लख्या हा त्याच्या मूळगावी असल्याचे समजताच दरोडा प्रतिबंधक पथकाने सापळा रचून रात्री साडेअकरा वाजता त्याच्या घरून त्याला ताब्यात घेतले, तर स्थानिक गुन्हे शाखेने वाघ्याला रायगड जिल्ह्यातील खोपोली येथून जेरबंद केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, सुरेश बुधवंत, सहायक निरीक्षक श्रीकांत उबाळे, भास्कर पुल्ली, सचिन पुंडगे, नरेंद्र बांगर, तुळशीराम जगताप, भास्कर केंद्रे, शेख सलीम, मोहन क्षीरसागर, विष्णू चव्हाण, संजय खताळ, प्रकाश वक्ते, बबन राठोड, संघर्ष गोरे, नारायण साबळे, बाबूराव उबाळे, तुकाराम जोगदंड, भारत बंड, गणेश दुधाळ, अशोक दुबाले, हरिभाऊ बांगर, अंकुश दुधाळ आदींनी केली.