घंटागाड्यांचे ‘जीपीएस’ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:44 AM2017-07-26T00:44:05+5:302017-07-26T00:44:41+5:30
बीड नगर पालिकेतील घंटागाड्यांना दोन वर्षांपूर्वी ‘जीपीएस’ (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) बसवण्यिात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड नागर पालिकेतील घंटागाड्यांना दोन वर्षांपूर्वी ‘जीपीएस’ (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) बसवण्यिात आले होते. अवघ्या वर्षात हे बंद पडले. वर्षानंतरही ते सुरू झालेले नाही. त्यामुळे जीपीएसवर केलेला लाखो रूपयांचा खर्च कचºयात गेल्याचे दिसून येत आहे. जी स्वच्छता होते, ती केवळ कागदोपत्रीच असल्याचेही धक्कादायक वास्तव मंगळवारी उघड झाले.
घंटागाडी वेळेवर गल्लीत जाते का, किती वेळे फिरते, उचललेला कचरा निर्गमित केलेल्या ठिकाणीच टाकला जातो का, यासारख्या प्रश्नांची तात्काळ उत्तरे मिळावीत व यंत्रणा कार्यान्वित होऊन शहर स्वच्छ व्हावे, या उद्देशाने दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांच्या कार्यकाळात बीड पालिकेच्या १४ वाहनांना जीपीएस बसविण्यात आले होते. यामुळे कामात सुसुत्रता आली होती. नागरिकांच्या घंटागाडी गल्लीत येत नसल्याच्या तक्रारी कमी झाल्या होत्या. तसेच जे रिक्षा घंटागाडीवाली गल्लीत जात नव्हते त्यांची आॅनलाईन माहिती घेऊन त्यांच्यावर कारवायाही झाल्या होत्या. हा सर्व प्रकार वर्षभर सुरळीत चालला. यामुळे पालिकेचा स्वच्छतेचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागून स्वच्छतेच्या कामात पारदर्शकता आली होती.
दरम्यान, लाखो रूपये खर्च करून बसविलेले जीपीएस यंत्रणा अवघ्या वर्षातच बंद पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याची वेळच्यावेळी दुरूस्ती व देखभाल न केल्यामुळेच जीपीएस बंद केल्याचे सूत्रांनी सांगितले. याच्या दुरूस्तीचा प्रस्ताव संबंधित कंत्राटदाराला पाठविल्याचेही पालिकेतील खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. परंतु ते कधी दुरूस्त होऊन यातील, याबाबत पालिकेतील एकही अधिकारी बोलण्यास तयार नाही. जीपीएस बसवून कामात पारदर्शकता आणण्याची मागणी होत आहे.