घाटीत कायदेशीर आणि वैद्यकीय सल्ल्याने वर्षभरात झाले सहाशे गर्भपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 08:20 PM2018-10-15T20:20:37+5:302018-10-15T20:21:14+5:30
गर्भपात हा स्त्रीचा हक्क आहे, हे अनेकांना माहीतच नाही.
औरंगाबाद : गर्भपात म्हटले की, दबक्या आवाजात उल्लेख केला जातो. मुलगी नको म्हणून गर्भपात केल्याच्या संशयित नजरेनेही पाहिले जाते; परंतु गर्भपात हा स्त्रीचा हक्क आहे, हे अनेकांना माहीतच नाही. कायदेशीर आणि वैद्यकीय सल्ल्याने गर्भपात केले जातात. एकट्या घाटी रुग्णालयात वर्षभरात सहाशे गर्भपात होत असल्याचे समोर आले आहे.
अनधिकृत गर्भपात हा समाजासाठी चिंतेचा विषय आहे. यापूर्वी अनेक घटनांतून अवैधरीत्या गर्भपात होत असल्याचा पर्दाफाश झालेला आहे. गर्भलिंग निदान कायद्याचा भंग करून गर्भपाताची दुकानदारी काहींकडून केली जाते. अशांवर आरोग्य विभागाची, पोलीस प्रशासनाची करडी नजर असते. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे अनेक कारणांमुळे कायदेशीर, वैद्यकीय सल्ल्यानुसार गर्भपात करण्याची वेळ येते. २० आठवड्यांपर्यंत गर्भपात हा कायदेशीर आहे.
काही प्रकरणांत न्यायालयाच्या आदेशानुसार २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात शक्य असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. गरोदरपणात सोनोग्राफी केल्यानंतर गर्भात व्यंग असल्याचे निदान झाल्यानंतरही तो वाढू दिला तर पुढे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे अशावेळी वैद्यकीय सल्ल्यानुसार गर्भपात होतात. महिन्याला जवळपास ५० गर्भपात एकट्या घाटीत होतात. त्यासाठी आवश्यक ती तपासणी केली जाते.
ही आहेत कारणे
अनेकदा गर्भनिरोधक उपाय करूनही गर्भ राहिलेला असतो, तर कधी महिला अत्याचाराची बळी असते. अनेकदा गर्भात काहीतरी दोषही आढळून येतो. त्यामुळे जन्मानंतर बाळात व्यंग राहण्याचा धोका असतो. शिवाय गर्भधारणेचा संबंधित स्त्रीला त्रास होत असेल, तिचा मानसिक छळ होत असेल, तर अशा परिस्थितीत गर्भपाताचा पर्याय निवडला जातो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
महिन्याला ५० गर्भपात
घाटीत महिन्याला जवळपास ५० गर्भपात केले जातात. गर्भपात हे वैद्यकीय सल्ल्यानुसार आणि कायदेशीर बाबी पाळून करण्यात येतात, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले.