घाटी रुग्णालयातील बालरोग विभाग ‘फुल्ल’, ९६ खाटांवर ९७ मुले भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 07:46 PM2024-07-23T19:46:59+5:302024-07-23T19:47:25+5:30

गॅस्ट्रो, व्हायरल फिव्हर, डेंग्यूसदृश आजाराचे बालरुग्ण सर्वाधिक

Ghati Hospital Pediatric Department 'Full', 97 children admitted on 96 beds | घाटी रुग्णालयातील बालरोग विभाग ‘फुल्ल’, ९६ खाटांवर ९७ मुले भरती

घाटी रुग्णालयातील बालरोग विभाग ‘फुल्ल’, ९६ खाटांवर ९७ मुले भरती

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील बालरोग विभागाचा वाॅर्ड सध्या बालरुग्णांनी भरून गेला आहे. बालरोग विभागात ९६ खाटांवर ९७ मुले उपचार घेत आहेत. गॅस्ट्राे, व्हायरल फिव्हर, डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण सर्वाधिक असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलाने सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहेत. या आजारांचा विळखा ज्येष्ठ आणि लहान मुलांना सर्वाधिक पडत आहे. घाटीतील बालरोग विभागाची रोजची ओपीडी शंभरच्या वर गेली आहे.

मुलांना ‘ताप’, पालकांना ‘घाम’
सर्दी, खोकला, ताप, उलट्या-जुलाबामुळे अनेक बालकांवर रुग्णालयात दाखल करण्याची वेळ ओढवत आहे. मुलांच्या प्रकृतीच्या चिंतेने पालकांना घाम फुटत असल्याची परिस्थिती आहे.

१४ मुले व्हेंटिलेटरवर
बालरोग विभागात सध्या १४ मुले व्हेंटिलेटरवर आहेत. तर ११ मुले ऑक्सिजनवर आहेत. येथील ९६ खाटांवर ९७ बालके उपचार घेत असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली.

ओपीडी, आयपीडी वाढली
बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) आणि आंतररुग्ण विभागात (आयपीडी) येणाऱ्या रुग्णांची संख्या काही दिवसांत वाढली आहे. गॅस्ट्रो, व्हायरल फिव्हर, डेंग्यू सदृश आजारांचे बालरुग्ण वाढले आहेत. विभागात ९६ खाटा असून, सध्या ९७ रुग्ण दाखल आहेत.
- डाॅ. प्रभा खैरे, बालरोग विभागप्रमुख, घाटी

पालकांनो, ही घ्या काळजी...
- मुलांना शुद्ध पाणी आणि पौष्टिक आहार द्यावा.
- मुलांनी नियमितपणे हात धुवावेत.
- स्वच्छता राखावी आणि मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेणे टाळावे.
- गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे.
- मुलांना काही त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: Ghati Hospital Pediatric Department 'Full', 97 children admitted on 96 beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.