घाटी रुग्णालयाला मनुष्यबळाची प्रतीक्षाच; इतर विभागाच्या रुग्णालयातील पदांना मिळतेय मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 05:11 PM2019-06-11T17:11:32+5:302019-06-11T17:19:23+5:30
जळगावला झुकते माप देऊन मराठवाड्याकडे दुर्लक्ष
औरंगाबाद : जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासाठी पदनिर्मितीला नुकतीच मान्यता देण्यात आली. यापूर्वी बारामती येथील पदनिर्मितीला मान्यता देण्यात आली होती. मात्र, घाटी रुग्णालयात उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी विभागाच्या पदनिर्मितीसह घाटीतील रिक्त पदे भरण्याची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे.
जळगाव येथे ५०० खाटांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्यात आले. रुग्णालयासाठी ५८१ पदांची चार टप्प्यांत पदनिर्मिती करण्यास ३० मे रोजी मान्यता देण्यात आली. त्याबरोबर बाह्ययंत्रणेद्वारे कामे करण्यासाठी वर्ग-३ मधील ३१ आणि वर्ग-४ मधील ४७४ पदांच्या निर्मितीलाही मान्यता देण्यात आली आहे. घाटी, कर्करोग रुग्णालयातील सहयोगी आणि सहायक प्राध्यापक असे १२ डॉक्टर आॅगस्ट-२०१८ मध्ये जळगावला पळविण्यात आले होते. जवळगावला झुकते माप देऊन औरंगाबादकडे पर्यायाने मराठवाड्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड होत आहे.
घाटीत केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने २२० खाटांचे स्वतंत्र सुपरस्पेशालिटी विभाग उभारण्यात आले आहेत. विभागाचे काम ९० टक्क्यांवर पूर्ण झाले आहे; परंतु या विभागासाठी अद्यापही पदनिर्मिती झालेली नाही. घाटी प्रशासनाकडून या विभागासाठी पूर्वी ४२६ पदांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानंतर १३७९ पदांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यात वेळोवेळी सुधारणा, बदल करून घाटी प्रशासनाकडून ११०० पदांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने ८०० पदांवर आणला असून, तो मंजुरीसाठी शाासनाकडे असल्याची माहिती घाटी प्रशासनाकडून देण्यात आली. पदनिर्मितीशिवाय हा विभाग रुग्णसेवेत दाखल होणे अशक्य आहे. त्यामुळे घाटी प्रशासनाचेही प्रस्ताव मंजुरीकडे लक्ष लागले आहे.
प्रस्ताव सादर
सुपरस्पेशालिटी विभागासाठी यंत्रसामग्री दाखल होत आहे. विभागाचे कामही ९० टक्क्यांवर झाले आहे. पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आलेला आहे, अशी माहिती घाटी प्रशासनाकडून देण्यात आली.