घाटी रुग्णालयाची वाटचाल खाजगीकरणाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 01:04 PM2018-05-05T13:04:29+5:302018-05-05T13:07:34+5:30
मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधार ठरलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (घाटी) खाजगीकरणाकडे वाटचाल सुरू आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधार ठरलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (घाटी) खाजगीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. आऊटसोर्सिंगने ६० कर्मचारी घेण्यात आल्यानंतर आता रक्त तपासण्या, सिटीस्कॅन, एमआरआयसह विविध चाचण्या, धोबीघाट, स्वयंपाकगृहाच्या आऊटसोर्सिंगचा घाट वरिष्ठ पातळीवर रचला जात आहे.
सरकारी रुग्णालयांबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध सेवांचे खाजगीकरण करण्यासाठी सध्या हालचाली सुरू आहेत. घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह लगतच्या भागातून दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. दिवसेंदिवस घाटी रुग्णालयावर रुग्णसेवेचा ताण वाढत आहे. तुलनेत सोयीसुविधांमध्ये वाढ होण्यासाठी नुसती प्रतीक्षा करण्याची वेळ येते. यंत्रसामुग्री, निधींसाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा करावा लागतो. अपुऱ्या सोयीसुविधात रुग्णसेवा देताना मोठी कसरत करण्याची वेळ प्रशासनावर येत आहे, अशा परिस्थितीत रुग्णालयावरील भार कमी करून थेट आऊटसोर्सिंगद्वारे विविध सेवा घेण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत.
खाजगीकरणाच्या कक्षेत येत आहेत सेवा
निविदा प्रक्रिया राबवून आॅक्टोबर २०१७ मध्ये घाटीत कंत्राटदारामार्फत सफाईगार तथा चतुर्थश्रेणीचे ६० कर्मचारी घेण्यात आले. आता विविध प्रकारच्या चाचण्या, स्वयंपाकगृह, धोबीघाटचेही आऊटसोर्सिंग करण्यासाठी पडताळणी केली जात आहे. घाटी रुग्णालयात वर्षभरात विविध आजारांसाठी रक्ताच्या १ लाख ९० हजार चाचण्या होतात, तर दररोज २५ एमआरआय तर ८० ते १०० सिटीस्कॅन केले जातात. दररोज काढण्यात येणाऱ्या एक्सरेचे प्रमाणही अधिक आहे. रुग्णांची संख्या अधिक असल्याने तपासणीसाठी तारीख दिली जाते. दाखल होणाऱ्या रुग्णांना घाटीतील स्वयंपाकगृहात तयार होणारे जेवण दिले जाते, तर धोबीघाटमध्ये रुग्णांचे कपडे, चादरी धुतल्या जातात. या सगळ्या बाबी आगामी कालावधीत आता खाजगीतून करून घेण्याकडे सरकारची पावले पडत आहेत.
धोरणात्मक निर्णय
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील यंत्र दर महिन्याला बंद पडण्याचे प्रकार होतात. यंत्रांची दुरुस्ती करणारे येतच नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाते; परंतु रुग्णांची गैरसोय होते. त्यामुळे आगामी कालावधीत सिटीस्कॅन, एमआरआय सेवेचे आऊटसोर्सिंग करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याचा विचार सुरू आहे. शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
- डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय
खाजगीकरणाविरूद्ध आंदोलन सुरू
आऊटसोर्सिंगद्वारे कर्मचारी घेण्यात आल्यानंतर आता धोबीघाट, स्वयंपाकगृहाची माहिती घेण्यात आली. यातून जेवण देण्याचे आणि कपडे धुण्याचे प्रमाण जाणून घेण्यात आले. एकेक विभागाचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. ही खाजगीकरणाची सुरुवात आहे. त्यामुळे याविरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
- अमोल शेगोकार, सचिव, महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ
डॉक्टरांना प्रात्यक्षिक करता येणार नाही
रक्ताच्या चाचण्या किती होतात, याची केवळ माहिती घेण्यात आली आहे. काही चाचण्यांचे खाजगीकरण झाले, तर डॉक्टरांना प्रात्यक्षिक करण्यास मिळणार नाही, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या.