घाटीला मिळणार निधी; राज्यमंत्री चव्हाण यांची विधान परिषदेत माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 07:36 PM2018-03-14T19:36:38+5:302018-03-14T19:38:31+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विविध यंत्रसामग्री, इमारत बांधकामासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत सांगितले.
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विविध यंत्रसामग्री, इमारत बांधकामासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत सांगितले.
घाटी रुग्णालयातील रिक्त पदे भरून निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आ. सतीश चव्हाण यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. बंधपत्रित डॉक्टरांची भरती करण्याचे अधिकार पुन्हा अधिष्ठातांना देण्यात यावे, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले. राज्यमंत्र्यांनी बंधपत्रित उमेदवारांची भरती करण्याचे अधिकार पुन्हा अधिष्ठातांना देण्यात येतील, असे सांगितले. रवींद्र चव्हाण म्हणाले की, घाटी रुग्णालयातील वर्ग-१ ते वर्ग-४ या संवर्गातील रिक्त पदे भरण्याची कारवाई सुरू आहे. येथील विविध यंत्रसामग्रीसाठी तसेच इमारत बांधकामासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच घाटी रुग्णालयातील एमआरआय मशीनसाठी ४० लाख रुपयांचा भाग (पार्ट) जर्मनीहून मागविण्यात आल्याचेदेखील रवींद्र चव्हाण यांनी सभागृहात सांगितले.