घाटीच्या अजब कारभाराचा स्वाईन फ्लू रुग्णांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 01:14 PM2018-09-28T13:14:18+5:302018-09-28T13:15:03+5:30
या सगळ्यात रुग्ण आणि नातेवाईकांना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या.
औरंगाबाद : स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचाराची जबाबदारी नसल्याचे म्हणत वॉर्ड बंद करणाऱ्या घाटी प्रशासनाच्या अजब कारभाराचा गुरुवारी रुग्णांना फटका बसला. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे बोट दाखविणाऱ्या घाटीने सहा तासांत स्वाईन फ्लूचा वॉर्ड पुन्हा उभा केला. परंतु या सगळ्यात रुग्ण आणि नातेवाईकांना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या.
घाटी रुग्णालयातील स्वाईन फ्लूचा वॉर्ड बंद करून गुरुवारपासून चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचार होणार होते. याठिकाणी घाटीतील डॉक्टर्स कार्यरत ठेवण्याचेही नियोजन करण्यात आले होते. खाजगी रुग्णालयांत स्वाईन फ्लूचा रुग्ण दाखल असेल तर त्याच्यावर शासकीय यंत्रणेच्या देखभालीत उपचार करणे आवश्यक असते. त्यामुळे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी बुधवारी रात्री घाटीतील डॉक्टरांशी संपर्क साधला, तेव्हा रुग्णाला गुरुवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे सकाळी रुग्णाचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात गेले. परंतु याठिकाणी उपचार सुविधा सुरू झालेली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
पुन्हा संपर्क करून दुपारी दीड वाजेच्या सुमारास रुग्णाला घेऊन ते घाटीत अपघात विभागात आले. रुग्णाला नेमके कुठे दाखल करावे, याची सहज माहिती मिळाली नाही. कशीबशी माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी स्वत:च रुग्णाला मेडिसीन विभागात दाखल केले. येथेही स्वाईन फ्लूचा वॉर्ड नेमका कुठे आहे, ही माहिती नसल्याने ते थेट दुसऱ्या मजल्यावर गेले. परंतु नव्याने तयार केलेला स्वाईन फ्लूचा वॉर्ड क्रमांक-५ तळमजल्यावर असल्याची माहिती मिळाली. वॉर्डात रुग्ण दाखल करेपर्यंत दुपारचे अडीच वाजून गेले होते. स्ट्रेचर स्वत:च ओढण्याची वेळ आली. रुग्णाला दाखल करेपर्यंत अनेक अडचणी आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी म्हणाले, घाटीतील वॉर्डासाठी आम्हीच ५ व्हेंटिलेटर दिले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे म्हणाले, घाटीतच उपचार करणे योग्य असल्याने वॉर्ड तयार केला. सध्या दोन पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.