घाटनांद्रा चिंचोली रस्त्याचे दोन वर्षातच वाजले बारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:04 AM2021-07-26T04:04:47+5:302021-07-26T04:04:47+5:30
घाटनांद्रा : घाटनांद्रा ते चिंचोली या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी गेल्या एका तपापासून सुरू होती. अखेर दोन ...
घाटनांद्रा : घाटनांद्रा ते चिंचोली या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी गेल्या एका तपापासून सुरू होती. अखेर दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण झाले. बांधकाम होऊन दोन वर्षही पूर्ण होत नाही. तोच या रस्त्याचे बारा वाजले आहेत. जागोजागी खड्डे पडले वाहनधारकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. तर अपघात सत्र थांबता थांबेनासा झाला आहे.
बऱ्याच वर्षांच्या मागणीनंतर घाटनांद्रा ते चिंचोली या रस्त्याचे दोन वर्षांपूर्वी बांधकाम विभागाच्या वतीने डांबरीकरणाचे काम करण्यात आले. परंतु कामाला सुरुवात झाल्यापासूनच हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी असूनसुद्धा ठेकेदाराने घाईगडबडीत काम उरकले. संबंधित रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यावर जागोजागी खड्डेच खड्डे पडायला सुरुवात झाली. हा रस्ता कन्नड सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हद्दीतील असून कन्नडपासून ४० किलोमीटर अंतरावर आहे.
शासकीय नियमाप्रमाणे रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने पुढील तीन किंवा पाच वर्ष रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे. परंतु दोन वर्षात रस्ता दुरुस्तीचे काम झालेच नाही. अधिकारी व कंत्राटदाराने या रस्त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावरील शेतकरी भगवान मोरे, सांडू मोरे, बाजीराव मोरे, रामकृष्ण मोरे, सय्यद अन्सार आदींनी तशी बांधकाम विभागाकडे तक्रारही केली आहे.
---
कोट
मणक्यांचे आजार जडले
घाटनांद्रा येथे शासकीय कामकाजानिमित्त या रस्त्यावरून रोज प्रवास करावा लागतो. परंतु रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मला मणक्यांचा त्रास सुरू झाला आहे. रस्त्यावरील हे खड्डे त्वरित बुजविण्यात यावे, अशी मागणी राहील. - श्रीराम पवार, शासकीय कर्मचारी.
---
अधिकारी म्हणतात.. हे काम आमच्याकडे नाहीच
याविषयी कन्नड विभागाचे सार्वजनिक बांधकाम अभियंता सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, या रस्त्याचे डांबरीकरण्याचे काम जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कन्नड यांच्या अधिकारात करण्यात आले असल्याचे सांगून ते नामानिर्माळे झाले. तर जिल्हा परिषद बांधकाम विभाग कन्नडचे अभियंता यांनी फोन घेतला नाही.
250721\img-20210725-wa0018.jpg
घाटनांद्रा चिंचोली रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाचे प्रमाण वाढले आहे ( छायाचित्र दत्ता जोशी)