घाटनांद्र्याच्या ग्रामीण बँकेत कर्मचाऱ्यांची वाणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:04 AM2021-03-07T04:04:46+5:302021-03-07T04:04:46+5:30
घाटनांद्रा : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत बऱ्याच महिन्यांपासून कर्मचारीच नसल्याने शेतकरी व ग्राहकांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे येथे कर्मचाऱ्यांची ...
घाटनांद्रा : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत बऱ्याच महिन्यांपासून कर्मचारीच नसल्याने शेतकरी व ग्राहकांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे येथे कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा कोट्यवधीचा व्यवहार असलेली शाखा म्हणून घाटनांद्रा ही शाखा आहे. आमठाणा, देऊळगाव बाजार, केळगाव, धावडा, पेंडगाव, चारणेर यासह तेरा गावांचा कारभार या शाखेतून चालतो. घाटनांद्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून त्याचबरोबर व्यापारी, महिला व पुरुषांचे तीनशे बचत गटांचे काम या बँकेतून चालते. त्यात कर्मचारीच नसल्याने वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या ग्राहकांना पूर्ण दिवस बँकेत ताटकळत बसावे लागते.
सध्या बँकेमध्ये शाखा व्यवस्थापक व एक सहायक शाखा व्यवस्थापक कार्यरत असून बँकेत एक रोखपाल व एक लिपिक याप्रमाणे दोन जागा रिक्त आहेत. बँकेत रिक्त असलेली पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी मागणी चेअरमन अशोक गुळवे, कचरू मोरे, शिवनाथ चौधरी, संतोष बिसेन, नागनाथ कोठाळे व शेकडो शेतकऱ्यांनी केली आहे.
-----------
मुख्य शाखेकडे प्रस्ताव पाठविला
बँकेचे आमठाणा व घाटनांद्रा या ठिकाणी प्रत्येकी एक ग्राहक सेवा केंद्र असूनसुद्धा बँकेत ग्राहकांची दररोज मोठी गर्दी वाढलेली दिसत आहे. याविषयी शाखा व्यवस्थापक भरतकुमार भोई यांना विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की, बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे रिक्त असलेल्या जागेची माहिती पाठविली आहे.