घोंगडीला हवीय सरकारी मदतीची ऊब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:31 AM2018-01-02T00:31:11+5:302018-01-02T00:31:44+5:30

थंडीच्या दिवसांत ब्लँकेट, रग, चादरी यांना मागणी वाढते. मात्र, खात्रीने ऊब देणारी घोंगडी आता दुर्मिळ होत चालली आहे. घोंगडी बनविण्याचा व्यवसाय आर्थिक कारणास्तव अडचणीत आल्याचे या क्षेत्रातील मेंढपाळ सांगत आहेत. सरकारने मदतीची आर्थिक ऊब दिली, तर हा व्यवसाय अनेकांना आधार ठरू शकतो.

 Ghongadi wants to get bored with government help | घोंगडीला हवीय सरकारी मदतीची ऊब

घोंगडीला हवीय सरकारी मदतीची ऊब

googlenewsNext

प्रकाश काटकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव नाथाचे (ता. फुलंब्री) : थंडीच्या दिवसांत ब्लँकेट, रग, चादरी यांना मागणी वाढते. मात्र, खात्रीने ऊब देणारी घोंगडी आता दुर्मिळ होत चालली आहे. घोंगडी बनविण्याचा व्यवसाय आर्थिक कारणास्तव अडचणीत आल्याचे या क्षेत्रातील मेंढपाळ सांगत आहेत. सरकारने मदतीची आर्थिक ऊब दिली, तर हा व्यवसाय अनेकांना आधार ठरू शकतो.
हा व्यवसाय विशेषत: धनगर समाजातील मेंढपाळ लोक करतात. हातमाग (वीणकाम) करून घोंगडी बनवण्याचा व्यवसाय दुर्मिळ झाला असून, घोंगडीची बाजारपेठेत मागणी कमी झाली आहे. ज्यांच्याकडे मेंढ्या आहेत त्यांना लोकर ( मेंढ्यांचे केस) विकत घेण्याची गरज पडत नाही. एक घोंगडी बनवण्यासाठी चार ते पाच किलो लोकर लागते. लोकर कातून विणकाम केले जाते. त्यानंतर चिंचोक्याची खळ लावून घोंगडी बनविली जाते. बाजारपेठेत एका घोंगडीला सरासरी सातशे ते एक हजार रुपयापर्यंत किंमत मिळते.
एक घोंगडी बनविण्यासाठी किमान एक दिवसाचा अवधी लागतो. या एका घोंगडीमागे साधारणत: दोनशे ते तीनशे रुपयांचे उत्पन्न या व्यावसायिकांना मिळते, असे यातील जाणकारांनी सांगितले.
मेंढपाळ व्यावसायिक कमी झाल्याने घोंगडी बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल लोकर मिळत नसल्याने हातमाग कामाद्वारे घोंगडी बनवण्याचा व्यवसाय कमी झाला आहे. आजही घोंगडीला विशेष महत्त्व आहे. घोंगडीचा वापर खंडोबाची तळी उचलण्यासाठी व धार्मिक कामासाठी केला जातो.
आता ग्रामीण भागातही घोंगडीचा वापर कमी झाल्याचे दिसत आहे. घोंगडीचा वापर केल्यास कंबरदुखी, पाठदुखी कमी होते, असा दावाही केला जातो. शासनाकडून या व्यावसायिकांना आर्थिक मदत मिळाल्यास हा व्यवसाय स्पर्धेच्या युगात टिकू शकेल.
नवीन पिढीने पाठ फिरविली
खामगाव येथील रामचंद्र काटकर (५५) शेती करून घोंगडे बनवण्याचा व्यवसाय करतात. उत्पन्न कमी असल्याने नवीन पिढी या व्यवसायाकडे वळत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
लिंबाजी चिंचोली येथील सोसायटीचे चेअरमन गुनाजी ढेपले (६०) आजही घोंगडी बनवून विक्री करण्याचा व्यवसाय करतात. या हातमाग कामाला शासनाने कर्जाच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याची गरज आहे, तरच हा व्यवसाय टिकेल, असे ते म्हणाले.

Web Title:  Ghongadi wants to get bored with government help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.