अद्रकीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:04 AM2021-04-20T04:04:31+5:302021-04-20T04:04:31+5:30
हतनूर : कन्नड तालुक्यातील हतनूर परिसरात यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अद्रकाची लागवड केली आहे. उत्पन्नाच्या अपेक्षेने त्यावर मोठा खर्च ...
हतनूर : कन्नड तालुक्यातील हतनूर परिसरात यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अद्रकाची लागवड केली आहे. उत्पन्नाच्या अपेक्षेने त्यावर मोठा खर्च देखील करण्यात आला. पण कोरोनामुळे बाजारपेठांवर झालेला परिणाम तसेच इतर कारणांनी अद्रकीचे भाव प्रचंड घसरले आहेत. यामुळे लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
हतनूरसह, शिवराई, बनशेंद्रा, बहिरगाव, डोणगाव, टापरगाव आदी गावांमध्ये गेल्या दहा ते बारा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अद्रकीचे उत्पन्न घेतले जाते. गेल्यावर्षी पाऊस चांगला झाल्याने नगदी पैसे देणारे पीक म्हणून शेतकऱ्यांनी या भागात मोठ्या प्रमाणात अद्रक लागवड केली आहे. उत्पन्न मिळेल या आशेवर त्यावर मोठा खर्चही केला. त्याचे चांगले फलित म्हणून उत्पन्नही चांगले आले आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांना एकरी शंभर ते दीडशे क्विंटल उत्पन्न आले आहे. ऐन अद्रक काढणीच्या वेळी अद्रकीच्या भावात प्रचंड घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत. परिसरातील व्यापारी सध्या नऊशे ते अकराशे रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे अद्रक खरेदी करीत आहेत. चांगले उत्पन्न मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी सरासरी चार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल बियाणे घेऊन लागवड केली. त्यावर महागडी औषध फवारणी, खते आदींचा खर्चही केला. भाव मिळाल्यास उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने शेतकऱ्यांनी अद्रक पिकावर खर्च करण्यास मोकळा हात सोडला होता. मात्र आता भावच घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. चार ते पाच हजार प्रतिक्विंटल भावाने विकले जाणारे अद्रक सध्या नऊशेच्या भावाने विकले जात असल्याने लागवड खर्चही निघेनासा झाला आहे.
कोट
गतवर्षी उत्पन्न व भावही चांगला मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अद्रक लागवड केलेली आहे. पण कोरोनामुळे काही बाजारपेठा बंद असल्याने काही ठिकाणी भावात प्रचंड घसरण झाली आहे. सध्या नऊशे ते हजार रुपये प्रतिक्विंटल अद्रक आम्ही शेतकऱ्यांकडून घेत आहोत. जून महिन्याच्या शेवटी भाव वाढण्याची शक्यता आहे.
- अतिक सय्यद, व्यापारी
फोटो :
हतनूर परिसरात शेतातून अद्रक काढताना शेतकरी.
190421\sandip shinde_img-20210419-wa0022_1.jpg
हतनूर परिसरात शेतातून अद्रक काढताना शेतकरी.