आल्याचे भाव कोसळले, शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:05 AM2021-02-12T04:05:12+5:302021-02-12T04:05:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क केळगाव : परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणावर आल्याची लागवड करण्यात आली आहे. मात्र, बाजारात आल्याचे भाव प्रचंड ...

Ginger prices plummeted, farmers in trouble | आल्याचे भाव कोसळले, शेतकरी अडचणीत

आल्याचे भाव कोसळले, शेतकरी अडचणीत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

केळगाव : परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणावर आल्याची लागवड करण्यात आली आहे. मात्र, बाजारात आल्याचे भाव प्रचंड कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यामुळे आल्याचा लागवड खर्च तरी निघेल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

यंदा विहिरींना मुबलक पाणी असल्याने केळगाव परिसरात नगदी पैसे देणारे पीक म्हणून आले लागवडीचे क्षेत्र वाढले होते. एकरी १०० ते १५० क्विंटल मिळणारे उत्पन्न व दरवर्षी मिळणारा चांगला भाव यामुळेही शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. सरासरी चार ते पाच हजार प्रतिक्विंटलप्रमाणे बेणे खरेदी करुन केलेली लागवड, त्यानंतर खते, औषध फवारणी, मजुरी यावर शेतकऱ्यांनी आतापर्यंत मोठा खर्च केला आहे. भाव घसरणीला लागलेला असताना आल्याला कमीत कमी १,८०० ते २,००० रुपये क्विंटल भाव मिळेल, असा शेतकऱ्यांना अंदाज होता. कारण तीन महिन्यांपूर्वी याच भावात आल्याची विक्री होत होती. मात्र, ऐन पीक काढणीची वेळ आणि भावात प्रचंड घसरण झाल्याने आल्याचा दर ८०० ते ९०० रुपये क्विंटलवर आला आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. आतापर्यंत झालेला खर्च, मजुरीचा दर आणि हाती येणारे उत्पन्न यात मोठी तफावत असून, झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुरते हादरले आहेत. त्यातच आता विहिरींची पाणीपातळी कमी झाल्यामुळे नाईलाजाने शेतकरी कमी दरात व्यापाऱ्यांना आल्याची विक्री करत आहेत.

कोट

यावर्षी मी आल्याची लागवड केली आहे. बेणे आणण्यासह त्यावर खूप खर्चही केला. पीकही चांगले आले आहे व वजनही चांगले भरत आहे. मात्र, भाव मिळत नसल्याने अवघड झाले आहे. किमान खर्च तरी निघावा एवढीच अपेक्षा आहे.

- भगवान कोठाळे, शेतकरी, केळगाव.

कोट..

अगोदरच शेतकरी अडचणीत आहे. त्यात आले पिकातून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, भाव गडगडल्याने भ्रमनिरास झाला आहे. पिकासाठी केलेला खर्च व मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी तफावत आहे. यामुळे कर्जाचा डोंगर आणखीनच वाढत जाणार आहे.

- स्वप्नील शिंदे, शेतकरी, आधरवाडी.

फोटो : केळगाव परिसरात आले लागवड करतानाचे छायाचित्र.

Web Title: Ginger prices plummeted, farmers in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.