माहिती विचारणा-या विद्यार्थिनीला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:26 AM2017-10-13T00:26:20+5:302017-10-13T00:26:20+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवी अर्ज भरण्यासाठी माहिती विचारणा-या विद्यार्थिनीला सहायक कुलसचिवाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवी अर्ज भरण्यासाठी माहिती विचारणा-या विद्यार्थिनीला सहायक कुलसचिवाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
जालना येथील मत्स्योदरी विधि महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या शिखा साबू ही विद्यार्थिनी पदवी प्रमाणपत्रासाठी गुरुवारी पुण्याहून विद्यापीठात आली होती. पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी तिने अर्ज भरला. मात्र, अर्जात त्रुटी असल्यामुळे संबंधित लिपिकाने सहायक कुलसचिव हेमलता ठाकरे यांना भेटण्यास सांगितले. या विद्यार्थिनीने ठाकरे यांना अडचण सांगितली. अर्जातील त्रुटी दाखवत ठाकरे यांनी बोलण्यास नकार दिला. ठाकरे यांचा संताप वाढल्यामुळे दोघीत बाचाबाची झाली. तेव्हा ठाकरे यांनी अचानकपणे हल्ला करून दोन झापडा मारल्या. त्यानंतर केस पकडून हात पिरगाळून कार्यालयाबाहेर काढल्याचे साबूने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. हा प्रकार घडत असताना परीक्षा भवनातील अनेक कर्मचारी उपस्थित होते. मात्र, त्यांनी साबूलाच बाहेर जाण्यास सांगितले. तेव्हा साबूने १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावले. बेगमपुरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी आल्यानंतर दोघींची चौकशी करण्यात आली. उपकुलसचिव प्रताप कलावंत यांच्या दालनात साबूने अर्ज भरून पुढील प्रक्रिया पूर्ण केली. या प्रकाराचा संबंधित अधिकाºयांकडून खुुलासा मागवल्याचे संचालक डॉ. सतीश दांडगे यांनी सांगितले.