घाटी रुग्णालयाच्या निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाराच्या मुलीचा डेंग्यूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 06:31 PM2018-12-14T18:31:24+5:302018-12-14T18:33:04+5:30
निवासस्थानांच्या चारही बाजूने घाणीचा विळखा आहे.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या निवासस्थानात राहणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा डेंग्यूने मृत्यू झाला. शीतल साईनाथ कीर्तिकर असे मृत मुलीचे नाव असून गुरुवारी सकाळी तिला घाटीच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, घाटी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागातील अस्थीव्यगोपचार विभागात साईनाथ कीर्तिकर हे कार्यरत आहेत. त्यांना परिसरातील बी-2 विंग मधील 8 नंबरचे निवास्थान मिळाले आहे. येथील निवासस्थानांच्या चारही बाजूने घाणीचा विळखा आहे. यामुळे येथे राहणाऱ्या आणखी दोघाना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती येथील रहिवाशी रवी मगरे यांनी दिली. शीतलच्या मृत्यू नंतर कर्मचारी निवासस्थानातील रहिवाशी कर्मचारी व नातेवाईकांनी प्रशासन स्वच्छतेकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केला. तर कास्ट्राईब कर्मचारी संघटनेनेचे विलास जगताप यांनी शीतलच्या मृत्यूला घाटी तसेच विनंती करूनही ड्रेनेजची दुरुस्ती न करणारा सार्वजनिक बांधकाम विभाग कारणीभूत असल्याचा सांगितले. या घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय अधीक्षक डॉ कैलास झिने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास राठोड यांनी नातेवाईकांची भेट घेतली.