रिक्षातून मुलीची उडी: बायकोसोबतच्या भांडणातून मुलीला अश्लाघ्य प्रश्न, चालकाची कबुली
By राम शिनगारे | Published: November 16, 2022 07:34 PM2022-11-16T19:34:18+5:302022-11-16T19:34:31+5:30
आरोपीची चौकशीत माहिती : तीन दिवसांची पोलीस कोठडी
औरंगाबाद : अश्लाघ्य प्रश्न विचारल्यामुळे अल्पवयीन मुलीने धावत्या रिक्षातुन रस्त्यावर उडी घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर क्रांतीचौक पोलिसांनी आरोपीला अटक केली. या आरोपीने पत्नीसोबत घरात भांडण झाल्यामुळे तणावात दारू पिली. दारूच्या नशेतच मुलीसोबत अश्लाघ्य बोललो अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत दिली आहे. या आरोपीस न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी सांगितले.
सय्यद अकबर सय्यद हमीद (३९, रा. प्लॉट नं. १५६, कैसरबाग, पडेगाव) या चालकाने गोपाल टी येथून रिक्षात बसलेल्या अल्पवयीन मुलीला कौटुंबिक माहिती विचारल्यानंतर शाळा, कॉलेज, क्लासविषयी जाणून घेतले. त्यानंतर त्याने तुला सोबत फिरायला आवडेल का? असेही विचारले. मुलगी यापुर्वी रिक्षात बसलेली असल्यामुळे तिने वडीलधारी चालकाला सर्व माहिती दिली. त्यामुळे चालकाने सिल्लेखाना चौकातून उजवीकडे रिक्षा वेगात घेऊन जात असताना त्याने तुला सेक्स करायला आवडेला का? अशी विचारणा केली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने संकल्प क्लाससमोर रस्त्यावर उडी घेतली. यात मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. क्रांतीचौक पोलिसांनी तात्काळ रिक्षाचा शोध घेत आरोपी चालक सय्यद अकबर यास बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या चौकशीत त्याने १३ नोव्हेंबर रोजी सकाळी पत्नीसोबत भांडण झाले होते. त्या भांडणाच्या तणावात सकाळीच दारू पिलो, त्यानंतर रिक्षात बसलेल्या मुलीला अश्लाघ्य बोललो असेल अशी कबुली दिली. दरम्यान, विविध चालक रिक्षात बसलेल्या मुलींना अशाच पद्धतीची टॉन्टीग करीत असतात. त्यांच्यातील चर्चेतुनच आरोपीने मुलीसोबत असे वर्तन केले असावे, असा अंदाजही पोलिसांनी काढला आहे. त्याशिवाय पोलीस कोठडीत आरोपीकडून अधिक माहिती मिळेल, असेही क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले.
मुलीची प्रकृती धोक्याबाहेर
रिक्षातुन उडी टाकल्यामुळे गंभीर जखमी मुलीवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या मुलीची प्रकृती धोक्याबाहेर आली असून, अद्यापही अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दरम्यान, निरीक्षक डॉ. गणपत दराडे, तपास अधिकारी अमाेल सोनवणे यांच्यासह पथकाने आरोपीस न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तसेच आरोपी सय्यद अकबर यास तीन मुली असून, सर्वात मोठी मुलगी ही १४ वर्षांची असल्याचेही समोर आले आहे.