विद्यार्थिनींनो, सातच्या आत विद्यापीठ वसतिगृहात पोहोचा! प्रशासनाच्या निर्णयाने नवा वाद
By राम शिनगारे | Published: May 11, 2024 12:12 PM2024-05-11T12:12:24+5:302024-05-11T12:16:01+5:30
पोलिसांच्या सूचनेनंतर विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना सायंकाळी सात वाजेच्या आत वसतिगृहात पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यापीठात घडलेल्या काही घटनांमुळे शहर पोलिसांनी मुलींना सात वाजेच्या नंतर वसतिगृहाच्या बाहेर फिरण्यास बंदी घालण्याची सूचना केली होती. त्या सूचनेनुसार विद्यापीठ प्रशासनाने सात वाजेनंतर मुलींना वसतिगृहाच्या बाहेर जाण्यास मनाई केली आहे. या निर्णयाला अनेक विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.
विद्यापीठात दोन महिन्यांपूर्वी विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तेव्हापासून प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार पोलिस प्रशासनालाही एक पत्र लिहीत विद्यापीठ परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी १७ फेब्रुवारीस केली होती. त्यानुसार पोलिस प्रशासनाने २९ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवून काही सूचना केल्या होत्या. त्यात विद्यापीठ परिसरातील विद्यार्थिनींना ठरवून दिलेल्या सात वाजेनंतर वसतिगृहाच्या बाहेर जाऊ देऊ नये, असे सांगितले हाेते.
पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार विद्यापीठातील सामान्य प्रशासन विभागाने विद्यार्थी कल्याण संचालकांना ४ मे रोजी पत्र पाठवून पोलिसांच्या सूचनेची अंमलबजावणी करण्यास सांगितले. त्यानुसार संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी मुलींच्या वसतिगृहांच्या वाॅर्डनला पत्र पाठवून सात वाजेच्या नंतर कोणालाही बाहेर सोडण्यात येऊ नये, असे स्पष्ट केले. तसेच काही अनुचित प्रकार घडत असेल तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या अंमलबजावणीला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. त्यास विविध विद्यार्थी संघटनांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
इतर उपाय शोधा
सध्या विद्यापीठात वेगवेगळे वादग्रस्त निर्णय घेतले जात आहेत. त्यातून विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच आता नवीन निर्णयानुसार विद्यार्थिनींना सातच्या आत वसतिगृहात परतण्याचा आदेश निघाला. हा चुकीचा निर्णय आहे. वसतिगृहातील विद्यार्थिनी काही सहावी-सातवीला नाहीत. मुलींना वसतिगृहात कोंडून ठेवण्यापेक्षा सुरक्षेसाठी इतर उपाय योजले पाहिजेत.
- पल्लवी बोरडकर, एसएफआय संघटना
पोलिसांच्या सूचनेनुसार निर्णय
विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांनी काही सूचना केल्या होत्या. त्यात सात वाजेनंतर मुलींना वसतिगृहाच्या बाहेर सोडण्यात येऊ नये, असे म्हटले आहे. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार मुलींच्या सुरक्षेसाठी सात वाजेनंतर वसतिगृहाच्या बाहेर न सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
- डॉ. कैलास अंभुरे, संचालक, विद्यार्थी विकास विभाग