मुलींचे वसतिगृह असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:41 AM2017-09-10T00:41:59+5:302017-09-10T00:41:59+5:30

मुलींच्या शासकीय वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षकाच्या मदतीने अनोळखी पुरुषाने प्रवेश करीत तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला

 Girls' hostels are unsafe | मुलींचे वसतिगृह असुरक्षित

मुलींचे वसतिगृह असुरक्षित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मुलींच्या शासकीय वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षकाच्या मदतीने अनोळखी पुरुषाने प्रवेश करीत तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. या संदर्भात गृहपालाने शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली असून, त्याच्याविरोधात केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या निमित्ताने जिल्ह्यात पुन्हा एकदा महिला, मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कार्यालयांतर्गत बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. सद्यस्थितीत येथे जवळपास ३० मुली राहतात. शुक्रवारी गृहपाल घरी गेल्यानंतर रात्री १०.३५ मिनिटांनी अनिल रमेश चांदणे याने क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि. मुंबई अंतर्गत नेमलेल्या महिला सुरक्षा रक्षकाच्या मदतीने वसतिगृहात प्रवेश केला. हा प्रकार एका मुलीने खिडकीतून पाहिला. बराच वेळ झाल्यानंतर सर्व मुली एकत्रित खाली आल्या. त्यांना चांदणे व महिला सुरक्षा रक्षक अश्लील चाळे करताना निदर्शनास आले. त्यावर मुलींनी तात्काळ गृहपाल कविता गायकवाड यांना फोनवरुन माहिती दिली. १० मिनिटांनी गायकवाड वसतिगृहात आल्या. तोपर्यंत चांदणेने मुलींवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
गायकवाड यांना पाहताच चांदणेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यासाठी नेमलेल्या महिला सुरक्षा रक्षकानेही त्याला मदत केल्याचे शिवाजीनगर ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
उंच भिंत असतानाही चांदणेने तेथून पळ काढला. मात्र, मुली व इतरांनी धैर्याने सामना करीत त्याला पकडले. त्यानंतर मोठी गर्दी जमली. यावेळी अनिल चांदणे याने सर्वांसमोर गृहपाल व मुलींना धमक्या देण्यास सुरुवात केली. मात्र, मुली घाबरल्या नाहीत.
त्यानंतर येथे साध्या वेशातील एक पोलीस कर्मचारी आला. मी पोलीस आहे, याला माझ्या स्वाधीन करा, असे तो सांगत होता. यावेळी मुलींनी तुम्ही पोलीस नाहीत असे म्हणत चांदणेला सुपूर्द करण्यास नकार दिला. याचवेळी चार्ली पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर मुलींनी चांदणेला पथकाकडे स्वाधीन केले.
हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता गृहपाल गायकवाड या ९ ते १० मुलींसह शिवाजीनगर ठाण्यात गेल्या. चांदणे विरोधात रितसर कारवाईची तक्रार दिली. त्याच्या विरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे संबंधित पोलीस कर्मचारी शंकर राठोड यांनी सांगितले. कारवाईची खात्री पटल्यानंतरच मुली व गृहपाल तेथून परतल्या.
दरम्यान, या अर्ध्या तासाच्या कालावधीत पोलीस ठाण्यात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

Web Title:  Girls' hostels are unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.