बालिकाश्रमातील मुलींना ‘राखी’तून गवसले प्रगतीचे कौशल्य; राख्यांना 'काॅर्पोरेट'मध्ये मागणी
By साहेबराव हिवराळे | Published: August 30, 2023 08:03 PM2023-08-30T20:03:18+5:302023-08-30T20:03:28+5:30
अभ्यासाच्या वेळेशिवाय उर्वरित वेळेत हा उपक्रम मुलींनी राबविला आहे.
छत्रपती संभाजीनगर : लहान वयातच आई, वडिलांचे छत्र नाही किंवा खूप गरीब परिस्थितीमुळे जगणे कठीण आहे, अशा १०० मुलींना भगवानबाबा बालिकाश्रम शिक्षणासह स्वत:च्या पायावर कसे उभे राहता येईल, असे कौशल्याचे धडे देत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी तयार केलेल्या सुंदर राख्यांना काॅर्पोरेट सेक्टरच्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
राखी पौर्णिमेला बहुतांश लोकप्रतिनिधी अनाथालयात येऊन बालिकांकडून राख्या बांधून घेतात. १५ ते २० मुली अशा आहेत की त्या उत्तम राख्या बनवितात. आश्रमातील संचालिका व कर्मचारी महिलांनी राखीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करून दिली असून त्यापासून त्यांच्या काैशल्यातून विविध प्रकारच्या आकर्षक राख्या त्यांनी बनविल्या आहेत. अभ्यासाच्या वेळेशिवाय उर्वरित वेळेत हा उपक्रम मुलींनी राबविला आहे.
भाऊ मिळाल्याचा आनंद
यामुळे आपल्या चिंता विसरून नवीन आशा उत्पन्न होत आहे. या राख्यातून राखी पौर्णिमेला भाऊ मिळाल्याचा आनंद वाटतो, असे गायत्री पाटील, नंदिनी डमाले या मुलींनी सांगितले.
यंदा पाच हजार राख्या बनविल्या..
मुलींचे कौतुक करावे, ते थोडेच आहे, कारण त्यांनी यंदा ५ हजार राख्या तयार केल्या. पण मागणी वाढल्याने कमी पडल्या. पुढील वर्षी अधिक राख्या बनविण्याचा संकल्प मुलींनी व्यक्त केला आहे.
- कविता वाघ, संचालिका भगवानबाबा बालिकाश्रम