बिले द्या, अन्यथा मनपा प्रांगणातच विष घेऊ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:26 PM2019-01-30T23:26:29+5:302019-01-30T23:27:23+5:30
वर्षभरापासून कामांची बिले मिळत नसल्याने कंत्राटदारांच्या संयमाचा बांध बुधवारी फुटला. संतप्त कंत्राटदारांनी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या देऊन विष प्राशन करून मनपा प्रांगणातच आत्महत्या करण्याचा इशारा दिला. तीन दिवसांमध्ये बिलांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही कंत्राटदारांनी केली आहे.
औरंगाबाद : वर्षभरापासून कामांची बिले मिळत नसल्याने कंत्राटदारांच्या संयमाचा बांध बुधवारी फुटला. संतप्त कंत्राटदारांनी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या देऊन विष प्राशन करून मनपा प्रांगणातच आत्महत्या करण्याचा इशारा दिला. तीन दिवसांमध्ये बिलांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही कंत्राटदारांनी केली आहे.
काही कंत्राटदारांची बिले एक ते दीड वर्षांपासून अडकलेली आहेत. १५० पेक्षा अधिक छोट्या कंत्राटदारांनी ११५ वॉर्डातील विकासकामे पूर्णपणे बंद केली आहेत. काहींनी कर्ज घेऊन, काही कंत्राटदारांनी उधारीवर कामाचे साहित्य आणले. कर्जबाजारी कंत्राटदारांना सध्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही अवघड झाले आहे. बुधवारी सकाळी सर्व कंत्राटदार एकत्र आले. त्यांनी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि महापौरांची भेट घेऊन आपले गाºहाणे मांडले. तीन दिवसांमध्ये प्रशासनाने थोडीफार रक्कम प्रत्येक कंत्राटदाराला न दिल्यास प्रांगणातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा इशारा दिला.
महापालिका प्रशासन, पदाधिकाºयांनी क्षमतेपेक्षा तीनपट मोठा अर्थसंकल्प तयार करून ठेवला. १८०० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात नगरसेवकांनी कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा समावेश केला. अर्थसंकल्पानुसार अनेक नगरसेवकांनी कोट्यवधी रुपयांची कामेही करून टाकली. त्यामुळे मागील आठ महिन्यांमध्ये लेखा विभागात मंजूर बिलांचा आकडा २०० कोटींवर गेला. यापूर्वी एप्रिल २०१८ मध्ये कंत्राटदारांना बिले देण्यात आली होती. त्यानंतर ४० कोटी, १८ कोटींची बिले वाटप झाली. मागील सहा महिन्यांपासून तर बिलांना पूर्णपणे ब्रेकच लावण्यात आला. ज्येष्ठता यादीनुसार बिले वाटप करण्यात येणार असे वारंवार सांगण्यात आले. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही.
दोन कोटींची बिले अदा
पाणीपुरवठा विभागातील कंत्राटदारांनी २१ जानेवारीपासून कामबंद केले होते. शहरातील जलवाहिनी दुरुस्ती करण्यास कंत्राटदारांनी दोनदा नकार दर्शविला. अधिकाºयांनी कंत्राटदारांची समजूत घालून बिले लवकर दिली जातील, असे आश्वासन देऊन काम करून घेतले. बुधवारी पाणीपुरवठा विभागातील अकरापेक्षा अधिक कंत्राटदारांना २ कोटींची बिले अदा करण्यात आली.
ड्रेनेज दुरुस्तीचे कंत्राटदार
शहरात चोकअप झालेली ड्रेनेज लाईन दुरुस्ती कंत्राटदारांकडूनच करण्यात येते. दुरुस्तीची बिलेही छोटी असतात. त्यांना प्राधान्याने बिले देण्याचे नियोजन लेखा विभाग, अतिरिक्त आयुक्त करीत आहेत. यानंतर इतर सर्व छोट्या कंत्राटदारांना अंशत: रक्कम देण्यात येणार आहे.
--------------