'कोविड भत्ता द्या, अन्यथा ड्युटी करणार नाही'; घाटी रुग्णालयात इंटर्न डॉक्टरांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 07:41 PM2021-05-05T19:41:16+5:302021-05-05T19:42:01+5:30
घाटीत १४४ इंटर्न डॉक्टरांची (आंतरवासिता) बुधवारपासून ड्युटी लावण्यात आली. त्यांना ११ हजार रुपये मानधन दिले जाते.
औरंगाबाद : कोविड भत्ता देण्याच्या मागणीसाठी इंटर्न डॉक्टरांनी दिलेल्या विविध घोषणांनी बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) परिसर दणाणून गेला. ५० हजार रुपये विद्यावेतन देण्यासह अन्य मागण्यांसाठी इंटर्न डॉक्टरांनी आंदोलन सुरू करत कोविड वाॅर्डात रुजू होण्यास नकार दिला.
घाटीत १४४ इंटर्न डॉक्टरांची (आंतरवासिता) बुधवारपासून ड्युटी लावण्यात आली. त्यांना ११ हजार रुपये मानधन दिले जाते. परंतु, हे मानधन अत्यंत कमी असल्याने इंटर्न डॉक्टरांनी सकाळी दहा वाजल्यापासून आंदोलन सुरू केले. मुंबई महापालिकेने तेथील इंटर्न डॉक्टरांना दरमहा ५० हजार रुपये कोरोना मानधन दिले. ११ हजार रुपये इतक्या विद्यावेतनाशिवाय हा अतिरिक्त कोरोना भत्ता देण्यात आला. याच धर्तीवर घाटीतील इंटर्न डॉक्टरांनी ५० हजार रुपये मानधन देण्याची मागणी केली आहे. त्याबरोबर इंटर्न डॉक्टरांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात यावे आणि कोविड ड्युटीदरम्यान राहण्याची आणि त्यानंतर क्वाॅरंटाईनची व्यवस्था करावी. आजारी पडल्यास उपचारांची जबाबदारीही शासनाने उचलावी, अशी मागणी करण्यात आली.
वर्षभरापासून मागणी
गेल्या वर्षभरापासून वरिष्ठ इंटर्न डॉक्टरांकडून मागणी केली जात होती. आता लेखी स्वरुपात आश्वासन जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत रूजू होणार नाही, असे नव्याने रूजू होणाऱ्या इंटर्न डॉक्टरांनी सांगितले. कोरोना काळात रुग्णसेवेत इंटर्न डॉक्टरांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे. परंतु, आंदोलनामुळे जवळपास १४४ इंटर्न डॉक्टर सायंकाळी रूजू झालेले नव्हते.