दस-यापूर्वी शेतक-यांना कर्जमाफी द्या, शिवसेनेचा विभागीय आयुक्तालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 07:31 PM2017-09-11T19:31:34+5:302017-09-11T19:35:48+5:30
शेतक-यांना दस-यापूर्वी कर्जमाफी द्यावी, ६६ प्रकारच्या माहितीचा अर्ज भरण्याची अट शिथिल करा, यासह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेने सोमवारी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला होता. शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्या, शिवसेना जिंदाबाद, यासह विविध घोषणा देत आणि हाती विविध मागण्यांचे फलक घेऊन शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी या मोर्चात सहभागी झाले.
औरंगाबाद,दि, 11 : शेतक-यांना दस-यापूर्वी कर्जमाफी द्यावी, ६६ प्रकारच्या माहितीचा अर्ज भरण्याची अट शिथिल करा, यासह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेने सोमवारी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला होता. शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्या, शिवसेना जिंदाबाद, यासह विविध घोषणा देत आणि हाती विविध मागण्यांचे फलक घेऊन शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी या मोर्चात सहभागी झाले. औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकातून काढण्यात आलेल्या या मोर्चाचा समारोप विभागीय आयुक्त कार्यालयावर झाला.
शेतक-यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी देण्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेला दोन महिने उलटले तरीदेखील अद्याप एकाही शेतक-याला कर्जमाफी मिळालेली नाही. शेतक-यांना कर्जमाफीचे ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात १ हजार ५०० केंद्रांवर ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा असल्याचे सांगण्यात आले; मात्र प्रत्यक्षात केवळ ५०० केंद्रांवरच आॅनलाइन फॉर्म भरले जात आहेत. एका केंद्रावर प्रतिदिन २० ते २५ शेतक-यांनाच अर्ज भरणे शक्य होते. ही बाब लक्षात घेऊन अर्ज भरण्याची मुदत वाढवावी, शेतक-यांकडून भरण्यात येणा-या अर्जांमध्ये ६६ प्रकारची माहिती अनावश्यक आहे.
यामुळे शेतक-यांना नाहक जाच आणि त्रास होत असल्याने यातून शेतक-यांची मुक्तता करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे सोमवारी संपूर्ण राज्यात जिल्हास्तरीय मोर्चे काढण्यात आले. औरंगाबादेतही शिवसेनेने मोर्चा काढला. हाती भगवे ध्वज, कर्जमाफीची मागणी करणारे फलक आणि भगवे रुमाल गळ्यात घालून हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी मोर्चात सहभागी झाले. शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे जिंदाबाद, दस-यापूर्वी शेतक-यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, आदी घोषणांनी मोर्चाचा मार्ग दणाणला.
विभागीय आयुक्तांना निवेदन
विभागीय आयुक्तालयासमोर मोर्चाचा समारोप झाल्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, आमदार संजय शिरसाट, आमदार संदीपान भुमरे, माजी आमदार आर. एम. वाणी, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, माजी आमदार अण्णासाहेब माने, उपमहापौर स्मिता घोगरे, महिला आघाडीच्या सुनीता आऊलवार, माजी महापौर कला ओझा यांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांशी शेतक-यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपायुक्त वर्षा ठाकूर आदी उपस्थित होते.