आठ दिवसांत समान पाणी द्या, टँकर बंद करा; महापौरांचा निर्वाणीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 01:12 PM2019-05-09T13:12:34+5:302019-05-09T13:22:02+5:30
शहरात उन्हाळा सुरू झाल्यापासून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
औरंगाबाद : शहरातील पाणी प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. सिडको-हडकोसह अनेक भागांत पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. आठ दिवसांमध्ये मनपा प्रशासनाने समान पाणी वाटपाचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन युद्धपातळीवर तोडावेत, एन-५ व एन-७ च्या जलकुंभावरून भरण्यात येणारे टँकर त्वरित बंद करा, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना सूचित केले.
शहरात उन्हाळा सुरू झाल्यापासून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सिडको-हडकोसह जालना रोडवरील अनेक वॉर्डांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. ज्या भागात जलवाहिनी नाही, त्या भागातील नागरिकांना टँकरसाठी पैसे भरूनही टँकर मिळत नसल्यामुळे रोष अधिक वाढला आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप, नगरसेवक दिलीप थोरात, कीर्ती शिंदे, नितीन चित्ते, ज्योती अभंग, प्रदीप बुरांडे, राहुल रोजतकर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी महापौरांनी पाणी प्रश्नावर अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. शहरात येणारे पाणी कमी झाले तरी नियोजन नसल्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांमधील अहंकारवृत्तीमुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. शहरात पाण्याचे समान वाटप करावे लागेल. काही भागांत तीन दिवसाआड, तर काही ठिकाणी आठ दिवसांआड असे होता कामा नये. आठ दिवसांत योजनेतील दोष दूर करून नियोजन करा, अशी सूचना त्यांनी केली.
गुन्हे दाखल करा
शहरात मुख्य जलवाहिनीवर असलेले सर्व नळ कनेक्शन काढून टाकावेत. पोलिसांना सोबत घेऊन मुख्य जलवाहिनीवरून नळजोडणी घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असेही महापौरांनी बजावले.
सहा कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या
पाणीपुरवठा विभागात सुधारणा घडवून आणण्यासाठी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या ११ अभियंत्यांपैकी ६ कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या पाणीपुरवठा विभागात करून उपअभियंता अशोक पद्मे व शेख खाजा यांना प्रत्येकी ३ अभियंते मदतीस देण्याचे आदेश महापौरांनी आयुक्तांना दिले, तसेच सेवानिवृत्त झालेले अभियंता गिरी यांना तातडीने पुन्हा नियुक्त करण्याचे आदेश दिले.
एमआयडीसीचे पाणी टँकरसाठी
एमआयडीसीने अडीच एमएलडी पाणी मंजूर केले आहे; परंतु एन-१ च्या जलवाहिनीवरून मनपा केवळ ०.५० एमएलडी पाणी घेत आहे. एन-५ आणि एन-७ च्या जलकुंभावरून भरण्यात येणारे टँकर बंद करावेत. एमआयडीसीचे पाणी पिण्यास योग्य असल्याचे नागरिकांना पटवून द्यावे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर योग्य कारवाई होत नाही. आठ दिवसांत सर्व त्रुटी दूर कराव्यात. आठ दिवसांनंतर पुन्हा बैठक घेण्यात येईल. त्यात सुधारणा न दिसल्यास पुढे काय करायचे ते ठरवू, असे घोडेले यांनी नमूद केले.