दागिने द्या; पावडरने चमकवून देतो ! १५ तोळ्यांचे अलंकार भामट्यांनी ढापले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 06:00 PM2022-12-30T18:00:42+5:302022-12-30T18:00:59+5:30
जवाहरनगर, एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हे दाखल
औरंगाबाद : आमच्याकडे एक पावडर आहे. त्या पावडरने घरातील फरशी, भांडी अतिशय स्वच्छ निघतात, अशी थाप मारत वृद्ध महिलांना गंडविल्याच्या घटना बुधवारी दुपारी जवाहरनगर, चिकलठाणा हद्दीत घडल्या. यात दोन ठिकाणांहून भामट्यांनी १५ तोळे सोने लंपास केले. याप्रकरणी जवाहरनगर व एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे नोंदविले आहेत. दोन्ही घटनांतील आरोपी एकच असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
सुशीला दाशरथे (८२, रा. लोकमित्र पोलिस कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी सकाळी साडेदहा वाजता दोन व्यक्ती त्यांच्या घरी आल्या. त्यांनी आमच्याकडे उजाला पावडर असून, त्याने फरशी स्वच्छ होते, असे सांगितले. तेव्हा सुशीला यांची सूनही घरी होती. भामट्यांनी दागिनेही स्वच्छ केले जात असल्याची थाप मारली. त्यानुसार सुशीला यांनी देव्हाऱ्यातील चांदीचे भांडे मागविल्यानंतर ते त्यांनी स्वच्छ करून दिले. त्यानंतर घरातील दागिन्यांना पॉलिशही करून देतो, असे सांगितले. तेव्हा सुशीला यांनी हातातील ५ तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या, अडीच तोळ्याची चेन, सुनेचे एक तोळ्याचे मंगळसूत्र आणि ५ ग्रॅमची अंगठी असे ९ तोळे सोने भामट्यांकडे दिले. त्यांनी सर्व दागिने एका कुकरमध्ये ठेवून स्वच्छ केल्याचा बहाणा करून ते पसार झाले. कुकर उघडून पाहिल्यानंतर त्यात दागिने नव्हते. तेव्हा भामट्यांनी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून, अधिक तपास उपनिरीक्षक वसंत शेळके करत आहेत.
अभियांत्रिकीचा विद्यार्थी असल्याची थाप
दुसरी घटना विमानतळासमोर घडली. निवृत्त शिक्षकाच्या पत्नी सुनीता अशोक कांगणे यांच्या घरी भामटे बुधवारी दुपारी गेले. अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून, माझ्याकडे पितळी तांब्याचे भांडे चमकविण्याची पावडर आहे. तुम्हाला भांडे चमकवून दाखवतो, असे सांगितले. त्यानुसार सुनीता यांना भांडे चमकवून दाखविल्यानंतर दुसऱ्याने सोन्याचे दागिनेही चमकविण्याची पावडर असल्याचे सांगितले. त्यानुसार सुनीता यांनी दोन तोळ्यांची पोत, चार तोळ्यांच्या पाटल्या दिल्या. त्यांनी सुनीता यांना घरात हळद आणण्यासाठी पाठवले. त्या आत जाताच भामट्यांनी सोने घेऊन धूम ठोकली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून, अधिक तपास सपोनि. शिवाजी चौरे करत आहेत.