पानगाव पोलिस ठाण्याचा तातडीने फेरप्रस्ताव द्या; गृहराज्यमंत्र्यांचे आदेश
By Admin | Published: February 26, 2016 11:46 AM2016-02-26T11:46:11+5:302016-02-26T11:46:27+5:30
पानगाव येथील पोलिस चौकीचे पोलिस ठाण्यात रुपांतर करण्यासाठी तात्काळ फेरप्रस्ताव सादर करा, असे निर्देश गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जिल्हा पोलिस प्रशासनाला दिले.
लातूर : पानगाव येथील पोलिस चौकीचे पोलिस ठाण्यात रुपांतर करण्यासाठी तात्काळ फेरप्रस्ताव सादर करा, असे निर्देश गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जिल्हा पोलिस प्रशासनाला दिले. दरम्यान, पोलिस ठाण्याच्या जागेचा शोध घेऊन जागा उपलब्ध करून द्यावी, असेही आदेश गृहराज्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
रेणापूर तालुक्यातील पानगाव हे अतिसंवेदनशील गाव आहे. गावची लोकसंख्या २५ हजारांच्या आसपास असून, तेथे असलेल्या पोलिस चौकीअंतर्गत अन्य १६ गावांचा समावेश आहे. पोलिस कर्मचार्यांचीही संख्या कमी आहे. गेल्या २0 वर्षांपासून पोलिस चौकीचे रुपांतर पोलिस ठाण्यात व्हावे, अशी मागणी परिसरातील लोकांची आहे. पोलिस ठाणे व्हावे म्हणून राज्य शासनाकडे प्रस्तावही सादर झालेला आहे. मात्र मंजुरी नाही. या संदर्भात 'लोकमत'मध्ये 'पानगावच्या पोलिस ठाण्याचा प्रस्ताव लालफितीत' या मथळ्याखाली वृत्त कालच प्रसिद्ध केले होते. दरम्यान, या वृत्ताची दखल घेत गृहराज्यमंत्र्यांनी जिल्हा पोलिस प्रशासनाला पानगाव पोलिस ठाण्यासाठी फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, पोलिस ठाण्याला जागा उपलब्ध करून द्यावी, असेही निर्देश त्यांनी जिल्हाधिकार्यांना गुरुवारी दिले. शिवजयंतीनिमित्त ध्वज लावण्याच्या कारणावरून दोन पोलिस कर्मचार्यांवर पानगाव येथे हल्ला झाला होता. या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्र्यांनी पानगावला भेट दिली. यावेळी ते म्हणाले, पानगाव येथे पोलिस ठाणे होणे आवश्यक आहे. गाव मोठे असून, चौकीअंतर्गत अनेक गावांचा समावेश आहे. त्यामुळे पोलिस ठाणेच असायला हवे. यापूर्वी जरी पोलिस ठाण्याचा प्रस्ताव पाठविला असला, तरी फेरप्रस्ताव पाठवा. त्यासाठी तात्काळ मंजुरी देण्यात येईल. पोलिस ठाण्याच्या जागेचाही प्रश्न आहे. तो प्रश्न स्थानिक पातळीवर जिल्हाधिकार्यांनी सोडवावा. जागा तात्काळ उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी यावेळी दिले.
दरम्यान, गृहराज्यमंत्र्यांनी पानगावला भेट दिल्यानंतर दुपारी १.३0 वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळीही त्यांनी पानगाव पोलिस ठाण्याचा फेरप्रस्ताव पाठविण्यासंदर्भात सूचना ■ पानगाव पोलिस ठाण्याचा प्रस्ताव यापूर्वीच पाठविण्यात आला आहे. परंतु, आता गृहराज्यमंत्र्यांनी फेरप्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार पूर्वी पाठविलेल्या प्रस्तावाची पडताळणी करून फेरप्रस्ताव तात्काळ पाठविला जाणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले. प्रस्ताव पाठविल्यानंतर जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन पानगाव पोलिस ठाण्याला जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात विनंती केली जाईल. राज्य शासनाकडे पानगावसह अन्य एका पोलिस ठाण्याचा प्रस्ताव आहे.
■ दोन्हीही प्रस्तावाला आता मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यावरही गृहराज्यमंत्र्यांसमवेत चर्चा झाली असून, पानगावच्या पोलिस ठाण्याचा रेंगाळलेला प्रस्ताव आता मार्गी लागला असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.