‘संत एकनाथ कारखाना’ घायाळ कंपनीला द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:31 AM2017-11-29T00:31:50+5:302017-11-29T00:32:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची साडेसाती काही संपता संपेना, असे झाले आहे. नाशिक येथील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची साडेसाती काही संपता संपेना, असे झाले आहे. नाशिक येथील शीला अतुलटेक शुगरने कारखाना सुरळीत चालू करून महिनाभराचा कालावधी लोटत नाही तोच हा कारखाना पुन्हा यापूर्वी करार केलेल्या सचिन घायाळ कंपनीस चालविण्यास द्यावा, असे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.
दरम्यान, साखर आयुक्तांनी दिलेल्या निर्णयास तातडीने न्यायालयात आव्हान दिले असून, संत एकनाथ आम्हीच चालवू, असे विद्यमान चेअरमन तुषार शिसोदे यांनी ठामपणे सांगितले आहे.
संत एकनाथ सहकारी साखर कारखाना मे. सचिन घायाळ कंपनीस २०१४/१५ ला तत्कालीन संचालक मंडळाने पुढील १८ वर्षे चालविण्यासाठी सहभागी तत्त्वावर चालविण्यासाठी दिला होता. याबाबतचा करार ३ आॅगस्ट, २०१५ रोजी झाला होता.
या करारास राज्य शासनाने ११ सप्टेंबर २०१५ रोजी मान्यता दिली होती. या करारानुसार वाद निर्माण झाल्यास साखर आयुक्तांनी लवादाची भूमिका पार पाडावी, असे नमूद केलेले आहे.
मे. सचिन घायाळ कंपनीने दोन गळीत हंगाम करून नंतरचा गळीत हंगाम केला नाही. यानंतर संचालक मंडळाच्या झालेल्या निवडणुकीत सत्तांतर होऊन कारखाना आ. संदीपान भुमरे यांच्याकडून तुषार शिसोदे यांच्या ताब्यात आला.
यानंतर कारखाना गळीत हंगाम न करता कारखाना बंद ठेवल्याने करारातील अटी व शर्तींचा भंग झाल्याने कारखान्यास ७६ कोटी रुपये सचिन घायाळ यांनी भरपाई द्यावी, असा दावा संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या वतीने साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांच्याकडे दाखल केला होता.
याबाबत गेल्या वर्षभरापासून सुनावनी सुरू होती. याबाबत संत एकनाथचे चेअरमन तुषार शिसोदे यांनी बाजू मांडली की, सचिन घायाळ यांनी गळीत हंगाम करण्यास नकार दिल्याने तालुक्यातील शेतकरी व कारखान्याचे सभासद यांचे नुकसान होणार होते.
यामुळे गळीत हंगाम सुरू करावा म्हणून सचिन घायाळ कंपनीकडे पाठपुरावा केला; परंतु त्यांनी दाद न दिल्याने कारखान्याच्या २६ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमुखाने सचिन घायाळ कंपनीचा करार रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
करार रद्द करण्याची नोटीस या कंपनीस बजावली. या नोटीसला या कंपनीने उत्तर दिले नाही. यानंतर १० एप्रिल २०१७ रोजी घायाळ कंपनीचा करार रद्द केला.
यानंतर आम्ही नाशिक येथील शीला अतुलटेक कंपनीस शेतक-यांचे हित लक्षात घेऊन कारखाना चालविण्याची विनंती केली. या कंपनीने कोट्यवधी रुपये लावून कारखाना चालू केला.
कारखाना गळीत हंगामास परवानगी द्यावी यासाठी शासनाकडे अर्ज केला आहे, असेही ते म्हणाले.