'जुनी पेन्शन नाहीतर मत नाही'; तब्बल २ हजार ४८५ गुरूजींची मते बाद, सर्वाधिक फटका काळेंना
By विकास राऊत | Published: February 3, 2023 05:05 PM2023-02-03T17:05:37+5:302023-02-03T17:07:53+5:30
शिक्षकांची मते बाद व्हावीत, हा संशोधनाचा विषय असला तरी बाद झालेल्या मतांमध्ये सर्वाधिक प्रमाण आमदार विक्रम काळे यांचे होते.
औरंगाबाद :मराठवाडाशिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत काही मतदारांनी जुनी पेन्शन योजना सुरू करण्याची आर्जव मतपत्रिकेतून केली. तर काहींनी गमतीदार आणि टीकात्मक प्रतिक्रिया नोंदविल्या. काही मतदारांनी उमेदवार काळे यांच्या मतदान करण्याच्या चौकटीत भोपळा खतविला, तर काहींनी पाटील यांच्या मत चौकटीत फुली मारली. पहिल्या पसंतीची मतमोजणी सुरू झाल्यावर अवैध मतांचा आकडा समोर येत असताना सुमारे २ हजार ४८५ मते अवैध ठरली होती. यात अनेक मतदारांनी जुनी पेन्शन योजना सुरू करा, अशी थेट मागणी मतपेटीतून नोंदविली. गेल्या निवडणुकीत २ हजार ३८५ मते बाद झाली होती. या निवडणुकीत मते बाद होण्याचे प्रमाण १ हजार राहिले.
गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. मराठवाडा रिअलटर्स प्रा. लि. या कंपनीच्या आवारात मतमोजणी झाली. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने, मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ही मतमोजणी ५३ टेबलांवर सुरू होती. पहिल्या पसंतीची मते राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांना २० हजार ७८, किरण पाटील यांना १३ हजार ४८९ मते तर सूर्यकांत विश्वासराव यांना १३ हजार ५४३ मते मिळाली. इतर ११ उमेदवारांना ३,५६१ पहिल्या पसंतीची मते मिळाली. पहिली पसंतीची मतमोजणी संपल्यानंतर दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला प्रारंभ झाला. २५ हजार ३८६ मतांचा कोटा विजयी होण्यासाठी निश्चित केला होता.
बाद मते कुणाची...
शिक्षकांची मते बाद व्हावीत, हा संशोधनाचा विषय असला तरी बाद झालेल्या मतांमध्ये सर्वाधिक प्रमाण आमदार काळे यांचे होते. माझ्यावर मतदारांचे अधिक प्रेम असावे म्हणून मतदारांनी अशा पद्धतीने ते व्यक्त केल्याचे आमदार काळे यांनी नमूद केले.