तुमचा पालापाचोळा आम्हाला द्या, मातीविरहित शेतीला हातभार लावा....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:04 AM2021-03-14T04:04:21+5:302021-03-14T04:04:21+5:30
एन-२ परिसरात राहणाऱ्या मंजिरी यांनी पर्यावरणासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. याविषयी सांगताना मंजिरी म्हणतात की, ज्यांच्या ...
एन-२ परिसरात राहणाऱ्या मंजिरी यांनी पर्यावरणासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. याविषयी सांगताना मंजिरी म्हणतात की, ज्यांच्या अंगणात खूप झाडी असतात, त्यांच्याकडे रोजच खूप पालापाचोळा जमा होतो. बराच पालापाचोळा जमला की, तो सरळ पेटवून देण्यात येतो. यामुळे मग अत्यंत उपयुक्त असणाऱ्या पालापाचोळ्याची राख होते आणि दुसरे म्हणजे धुरामुळे पर्यावरणाची हानी होते. याशिवाय आपल्याच आजूबाजूला असे काही लोक असतात ज्यांना कंपोस्टिंगसाठी पालापाचोळा पाहिजे असतो. म्हणूनच ज्याला नको आहे, त्याच्याकडून पालापाचोळा घेऊन यायचा आणि गरजवंतांपर्यंत पोहोचवायचा, असा उपक्रम मंजिरी यांनी औरंगाबाद शहरात सुरू केला आहे.
औरंगाबादला स्थायिक होण्यापूर्वी मंजिरी पुणे, बेंगलोर, विजयवाडा अशा अनेक गावी कामानिमित्त वास्तव्यास होत्या. या ठिकाणीही त्यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला आहे. मातीविरहित शेती, कंपोस्टिंग या गोष्टींना प्रोत्साहन, पर्यावरणाचे संवर्धन आणि कचरा जाळण्याच्या समस्येला आवर घालण्याच्या उद्देशाने त्यांनी औरंगाबादला या उपक्रमाची सुरुवात केली आहे.
चौकट :
पालापाचोळ्याचे करा कंपोस्ट
बागेत एक खड्डा तयार करून त्यात पालापाचोळा, निर्माल्य जमा करीत जायचे. आठवड्यातून एकदा त्यावर बाजारात मिळणारे बायोएन्झाईम, गोमूत्र, शेणाचे पाणी किंवा आंबट ताक यापैकी काहीही एक शिंपडायचे. काही महिन्यांमध्ये त्यापासून उत्तम कंपोस्ट खत तयार होते. ज्यांच्याकडे मुबलक माती नाही, पण बाग फुलवायची आहे, असे लोक मातीऐवजी या कंपोस्टिंगचा उपयोग करून मातीविरहित बाग फुलवू शकतात, असे मंजिरी यांनी सांगितले.