घाटीत कर्मचारी द्या, अन्यथा घटनेची पुनरावृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:09 AM2019-01-28T00:09:30+5:302019-01-28T00:09:53+5:30
घाटीत स्ट्रेचरअभावी नवजात बाळाचा मृत्यू झाला. घाटीत कितीही स्ट्रेचर दिले तरी कर्मचाऱ्यांशिवाय अशा घटना रोखणे अशक्य आहे. त्यामुळे घाटीला कर्मचारी पाहिजेत. अन्यथा घाटीत अशा घटना वारंवार होत राहतील, असे म्हणणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी रविवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर मांडले.
औरंगाबाद : घाटीत स्ट्रेचरअभावी नवजात बाळाचा मृत्यू झाला. घाटीत कितीही स्ट्रेचर दिले तरी कर्मचाऱ्यांशिवाय अशा घटना रोखणे अशक्य आहे. त्यामुळे घाटीला कर्मचारी पाहिजेत. अन्यथा घाटीत अशा घटना वारंवार होत राहतील, असे म्हणणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी रविवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर मांडले.
शहरात एका बैठकीसाठी आल्यानंतर गिरीश महाजन यांनी अधिष्ठातांकडून सात दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची माहिती घेतली. तेव्हा अधिष्ठातांनी रुग्णालयातील कर्मचाºयांच्या अपुºया संख्येने निर्माण झालेली परिस्थिती मांडली. कर्मचारी देण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जातील, असे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी सांगितल्याचे डॉ. येळीकर यांनी सांगितले.
घाटी प्रशासनाने या घटनेतील दोषींचा शोध घेण्यासाठी अपघात विभागातील सीसीटीव्ही चित्रीकरणाची पाहणी केली. त्यात संबंधित महिला येण्यापूर्वी उपलब्ध स्ट्रेचरवरून अन्य रुग्णाला हलविण्यात आले होते. सदर महिला आणि नातेवाईक थेट प्रसूती विभागाकडे गेल्याचे दिसत असल्याचा दावा घाटी प्रशासनाकडून करण्यात आला. स्ट्रेचरवरून वॉर्डात नेताना जर प्रसूती झाली असती, तर बाळ खाली पडले नसते. त्यामुळे स्ट्रेचरचा वापर केला असता तर ते सुखरूप राहिले असते, असे घाटीतील काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. ही संपूर्ण घटना ‘लोकमत’ने सविस्तर समोर आणल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यात घटनेच्या दिवशी कर्तव्यावर हजर असलेल्या डॉक्टरांपासून तर चतुर्थश्रेणी अशा दहा जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आता नेमकी कोणावर कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उत्तरे पाहून कारवाई
घाटीत चतुर्थश्रेणी कर्मचाºयांची संख्या कमी आहे. हीच परिस्थिती वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसमोर मांडली. बाळाच्या मृत्यूप्रकरणी कारणे दाखवा नोटीस दिलेल्या कर्मचाºयांकडून सोमवारी उत्तरे येतील. दिलेल्या उत्तरांची पडताळणी करून कारवाई केली जाईल, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.
-