पिण्यासाठी पाणी द्या, अथवा अंत्यविधीला या
By Admin | Published: March 29, 2016 11:48 PM2016-03-29T23:48:13+5:302016-03-30T00:04:33+5:30
नांदेड : जिल्ह्यात पाणीटंचाईचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत असून लोहा तालुक्यातील १२ हजार लोकसंख्येच्या माळाकोळी गावाचीही पाण्यासाठी फरफट होत आहे़
नांदेड : जिल्ह्यात पाणीटंचाईचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत असून लोहा तालुक्यातील १२ हजार लोकसंख्येच्या माळाकोळी गावाचीही पाण्यासाठी फरफट होत आहे़ त्यामुळे लिंबोटी धरणातून माळाकोळी गावाला पिण्यासाठी पाणी द्या, अन्यथा आमच्या अंत्यविधीला या असा निर्वाणीचा इशारा देत माळाकोळी ग्रामस्थांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आत्मदहनचा निश्चय केला आहे़
लोहा तालुक्यातील माळाकोळी हे सर्वात मोठे गाव आहे़ माळाकोळी ग्रामपंचायत अंतर्गत विठोबा, हरिश्चंद्र, देवलालष्करी, रुपता, खिरु, सीताराम, परसू, भिल्लू असे आठ तांडे आणि नागदरवाडी व कामजळगेवाडी या वाड्या येतात़ माळाकोळी गावात असलेली पाणीपुरवठा योजना ही ४४ वर्षे जुनी आहे़ त्यामुळे ही योजना पूर्णपणे कोलमडली असून त्याचा नागरिकांना प्रत्यक्षात कोणताही फायदा होत नाही़ ज्या तलावातून ही योजना चालविण्यात येते़ तो पाण्याचा स्त्रोत वर्षातून फक्त दोन महिने पुरेल एवढ्याच क्षमतेचा आहे़ त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या या गावाला लिंबोटी धरणातून पाणी पुरवठा केल्याशिवाय पर्याय नाही़ मागील २० वर्षांपासून या मागणीसाठी ग्रामस्थ लढा देत आहेत़ मात्र शासनाकडून दखल घेतली जात नाही़ त्यामुळे आता ८ एप्रिल रोजी स्मशानभूमीत सरण रचून उपोषण सुरु करण्यात येणार आहे़ शासनाने आम्हाला पिण्यासाठी पाणी द्यावे अन्यथा अंत्यविधीला तरी यावे अशी संतप्त भावना यावेळी सरपंच जालिंदर कागणे यांनी व्यक्त केली़