'घरात दडलेले सोने काढून देतो', आमिष देत बहीण-भावाने ८ लाखांना लुटले; ३ तोळे सोनेही लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 02:01 PM2024-03-22T14:01:11+5:302024-03-22T14:06:15+5:30
अंधश्रद्धेचे शहरातील सलग दुसरे प्रकरण, आरोपींची महिला पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून धमक्या, ठाण्यातही घातला धिंगाणा
छत्रपती संभाजीनगर : आजारी मुलीला बरे करण्यासाठी 'तुमच्या घरात सोने दडलेय, ते काढून देते', असे घाबरवून बहीण-भावाने एका तरुणाला ४.५ लाखांना फसवले. पोलिसांकडे तक्रार गेल्यावर याच बहीण-भावाने अन्य चौघांना अशाच प्रकारे ४ लाख ७१ हजार व ३ तोळे सोने घेऊन लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली. नुजत जाहेद शेख (रा. नंदनवन कॉलनी) व शेख इद्रिस अहेमद (रा. भडकल गेट) अशी आरोपींची नावे आहेत.
नुकतेच नारेगावच्या साहेबखान यासीनखान पठाण ऊर्फ सत्तार बाबाचा (५७, रा. नारेगाव) पैशांचा पाऊस पाडण्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर नंदवन कॉलनीत अंधश्रद्धेचे सलग दुसरे प्रकरण उघडकीस आले. रिक्षा चालक मेहराज पाशा सय्यद (२३, रा. पडेगाव) यांची नातेवाईक अफसाना यांची दहा वर्षाची मुलगी अनेक दिवसांपासून आजारी होती. त्यांना नुजत बाबत कळाल्यानंतर मेहराज, अफसाना मुलीला घेऊन एप्रिल, २०२३ मध्ये तिच्याकडे घेऊन गेले. नुजतने त्याला घरात सोने असल्यानेच मुलगी आजारी पडत आहे. ते काढून देण्यासाठी ६ लाख रुपयांची मागणी केली. तिने मेहराजचा विश्वास जिंकला. मेहराजने तिचा भाऊ इद्रिसकडे एकून ४.५ लाख रुपये दिले. मात्र, पैसे मिळताच बहीण-भाऊ फितूर झाले.
कोणाला बरे करणार, तर कोणाला नोकरीचे आमिष
नुजत, इद्रिसने मेहराज सोबतच अशाच प्रकारे नसरीन शेख जाफर शेख इब्राहिम (रा. पहाडसिंगपुरा) यांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून १ लाख रुपये व ८ ग्रॅम सोने घेतले. नाईदा बेगम मोहम्मद इलियास (रा. आरेफ कॉलनी) यांना आजारातून बरे करण्याचे आमिष दाखवून १ लाख ६३ हजार रुपये व २ तोळे सोने घेतले. गुलाब खान दौलत खान यांच्या मुलीला नोकरीचे आमिष दाखवून ३८ हजार, शेख शरीफ शेख मुसा (रा. अन्सार कॉलनी) यांना पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ३० हजार रुपये, असे मिळून ८ लाख ७१ हजार रुपये व २.८ तोळे सोने घेऊन गंडवले.
अखेर बहीण-भावाला अटक
तक्रार प्राप्त होताच निरीक्षक राजेंद्र होळकर यांच्या आदेशावरून पोलिसांचे पथक बुधवारी दुपारी नुजतच्या घरी गेले. त्यांना ठाण्यात चलण्यास सांगताच नुजतने स्वत:च्याच तोंडात मारून भिंतीवर डाेके आपटले. महिला कर्मचाऱ्याची कॉलर पकडून ढकलून देत घराबाहेर पळाली. पुरुष कर्मचाऱ्यांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केल्यावर रस्त्यावर लोळायला लागली. पोलिसांनी कसेबसे तिला ठाण्यात नेले. मात्र, काही वेळात एलआयसी एजंटचे काम करणारा तिचा भाऊ अतिक ठाण्यात गेला. पोलिसांना पुन्हा अश्लिलरीत्या शिवीगाळ करत महिला पोलिसाला ढकलून दिले. पोलिसांनी त्याला ताळ्यावर आणत बहीण-भावाला अटक केली. न्यायालयाने दोघांची हर्सूल कारागृहात रवानगी केली. उपनिरीक्षक सोपान नराळ याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.