गौरवास्पद ! डॉ. कारभारी काळे यांची ‘बाटू’च्या कुलगुरूपदी नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 02:32 PM2022-01-01T14:32:51+5:302022-01-01T14:39:54+5:30
डॉ. काळे यांनी पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाविद्यालय आणि विद्यापीठ मंडळाचे संचालक (बीसीयूडी) या पदावर यशस्वीरित्या काम केले.
औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (बाटू) कुलगुरूपदी डॉ. कारभारी काळे यांची नियुक्ती केली. डॉ. काळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. कुलगुरूपदी निवड झाल्याचे वृत्त विद्यापीठात धडकताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
डॉ. काळे यांनी पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाविद्यालय आणि विद्यापीठ मंडळाचे संचालक (बीसीयूडी) या पदावर यशस्वीरित्या काम केले. त्यांच्या नावावर अनेक पेटंट असून ते नुकतेच केंद्र सरकारच्या ‘लीडरशिप फॉर ॲकेडमिशिएशन प्रोग्राम’ (एलईएपी) योजनेंतर्गत तीन आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून आले आहेत.
‘बाटू’चे कुलगुरू डॉ. वेदला रामा शास्त्री यांनी वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर, २८ मार्च रोजी मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (आयसीटी) कुलगुरू डॉ. अनिरुद्ध पंडित यांच्याकडे या विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. आता डॉ. काळे यांची पूर्णवेळ कुलगुरूपदी राज्यपालांनी नियुक्ती केली आहे. डॉ. काळे यांनी भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएच.डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे.