गौरवास्पद! ६२ देशांच्या २०० प्रकल्पांच्या सादरीकरणात खाम नदी प्रकल्पाला पुरस्कार
By मुजीब देवणीकर | Published: May 22, 2024 11:23 AM2024-05-22T11:23:27+5:302024-05-22T11:31:33+5:30
खाम नदी पात्रातील गाळ काढणे, पात्र रुंद करणे आणि दोन्ही बाजूने दगडांची पिचिंग करण्याचे काम चार वर्षांपासून सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर : खाम नदीपात्राला गतवैभव मिळवून देण्यासाठी पाच वर्षांपासून महापालिकेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पाची आता आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट रॉस सेंटर प्राइज फॉर सिटीज’ अंतर्गत जगभरातील ६२ देशांनी आपले २०० पेक्षा अधिक अनोखे, नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. अंतिम पाच प्रकल्पांमध्ये खाम नदीपात्राने पुरस्कार पटकावला.
वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटतर्फे दरवर्षी हा प्रतिष्ठित पुरस्कार घोषित करण्यात येतो. नावीन्यपूर्ण कल्पना, दूरदर्शी प्रकल्प, शाश्वत विकास इ. मुद्द्यांवर जगभरातील विविध शहरे यात सहभागी होतात. यंदा पुरस्काराची थीम, हवामानासाठी सज्ज समुदायांना गती देणे अशी आहे. खाम नदी प्रकल्पाने यात बाजी मारली. खाम नदीपात्राला गतवैभव मिळवून देण्यासाठी महानगरपालिका, छावणी परिषद, व्हेरॉक, इकोसत्व यांच्या संयुक्त विद्यमाने २०२१ मध्ये प्रकल्प सुरू झाला. तत्कालीन मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या नेतृत्वाखाली कामाला सुरुवात करण्यात आली. नागरिक-खासगी-प्रशासन या तत्त्वावर प्रकल्प पुढे नेण्यास सुरुवात झाली. प्रत्येक शनिवारी नागरिक नदीची स्वच्छता करण्यास, सुशोभीकरण करण्यास व वृक्षारोपण करण्यास पुढाकार घेतात.
शहरासाठी अत्यंत गौरवाची बाब
आपले शहर आता जागतिक नकाशावर आले आहे. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट रॉस सेंटर प्राइज फॉर सिटीजसाठी प्रथम पाचमध्ये छत्रपती संभाजीनगरसोबत न्यूयॉर्क, ब्राझील, अर्जेंटिना व ओस्लो, नॉर्व्हे देशांमधील प्रकल्पांची निवड झाली. आपल्या शहरासाठी ही अत्यंत गौरवाची बाब आहे. या प्रकल्पाशी संबंधित संस्था, व्यक्ती व नागरिकांचे आणि माझ्या, महानगरपालिकेतील, टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. नदीची स्वच्छता करण्यास बरेच कठोर परिश्रम घ्यावे लागतात.
- जी. श्रीकांत, मनपा प्रशासक.