वैभवशाली महाराष्ट्र ! ३५८ तालुक्यांत ६८० ऐतिहासिक स्थळांचा ‘वारसा’
By संतोष हिरेमठ | Published: April 18, 2024 11:52 AM2024-04-18T11:52:02+5:302024-04-18T11:53:27+5:30
देश-विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू : काही वास्तूंचे वैभव जपले, काही स्थळांकडे दुर्लक्षामुळे वारसा धोक्यात
छत्रपती संभाजीनगर : ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा...’अशी महाराष्ट्राची वैभवशाली ओळख आहे. अनेक परंपरा, संस्कृतींबरोबर ३५८ तालुक्यांमध्ये तब्बल ६८० ऐतिहासिक स्थळांचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. काही वास्तूंचे वैभव शासनाने जपले आहे. मात्र, काही स्थळांकडे दुर्लक्षच होत असल्याने हा वारसा धोक्यात येत आहे.
दरवर्षी १८ एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि राज्य पुरातत्त्व विभागाकडून ऐतिहासिक स्थळांची देखरेख आणि संवर्धन केले जाते. राज्यात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाअंतर्गत २८६ आणि राज्य पुरातत्त्व विभागाअंतर्गत ३९४ स्थळे आहेत. लेण्या, किल्ले, प्राचीन मंदिरे, दरवाजा, बारव, मशीद, गुरुद्वारा अशा ऐतिहासिक वास्तूंचा यात समावेश आहे.
राज्यातील जागतिक वारसा स्थळ
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील पाच ठिकाणांचा समावेश आहे. यात जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, वेरूळ लेणी आणि मुंबईतील एलिफंटा लेणीचा समावेश आहे. त्याबरोबरच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक ऐतिहासिक आणि सर्वांत मोठे रेल्वे स्थानक आहे. यासह मुंबईचे व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेम्बल यांचा जागतिक वारसा स्थळात समावेश आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाअंतर्गंत असलेली स्थळे
मंडळ - स्थळांची संख्या
- छत्रपती संभाजीनगर- ७५
- नागपूर- ९४
- मुंबई - ११७
राज्य पुरातत्त्व विभागाअंतर्गत असलेली स्थळे
विभाग- स्थळांची संख्या
- रत्नागिरी- ४४
- नाशिक- ४९
- पुणे- ४०
- छत्रपती संभाजीनगर- ९८
- नांदेड - ८२
- नागपूर- ८१
वर्षभरात किती पर्यटक? (एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३)
स्थळ- भारतीय पर्यटक- परदेशी पर्यटक
बीबी का मकबरा- १२,५१,९२६-४२११
अजिंठा लेणी-३,२१,१९०-६७८८
वेरूळ लेणी-१२,५१,४७३-८९३३
देवगिरी किल्ला (दौलताबाद किल्ला)- ३,८८,३१७-१७९५
बुद्ध लेणी -९५,९६५-९१५
लेणी, किल्ले, दर्गा आदींचा समावेश
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळात लेणी, किल्ले, दर्गासह विविध एकूण ७५ स्थळांचा समावेश आहे. जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील अजिंठा आणि वेरूळ लेणीचा यात समावेश आहे. जागतिक वारसा दिनानिमित्त देवगिरी (दौलताबाद) किल्ला येथे ७५ स्थळांचे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
- डाॅ. प्रशांत सोनोने, सहायक अधीक्षक पुरातत्त्वविद,भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण