गौरवास्पद! प्रयोगशाळेतील कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीच्या संशोधनाला पेटंट
By राम शिनगारे | Published: July 18, 2023 08:10 PM2023-07-18T20:10:02+5:302023-07-18T20:10:12+5:30
विवेकानंद महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांसह इतर एकाचे संशोधन
छत्रपती संभाजीनगर : प्रयोगशाळेतील कचऱ्यापासून जैव इंधनाची निर्मिती करण्याचे संशोधन विवेकानंद महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांसह मायक्रोबायलॉजीस्ट सोसायटीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केले होते. त्यास भारत सरकारने सोमवारी पेटंट जाहीर केले. संशोधन करणाऱ्या प्राध्यापकांमध्ये डॉ. अनिल भुक्तार, डॉ. नितीन अधापूरे यांच्यासह डॉ. अरविंद देशमुख यांचा समावेश आहे.
शिक्षण, उद्योग संस्थांमधील प्रयोगशाळांमध्ये वापरलेल्या वस्तूंचा कचरा मायक्रोबियल कल्चर मिडिया डस्टबिनमध्ये टाकून देणे, बाहेर टाकणे किंवा जाळण्यासाठी कचरा तृतीय व्यक्तीला देण्यात येतो. सगळीकडेच हीच परिस्थिती आहे. मायक्रोबियल कल्चर मीडियाचा वापरणारे उद्योग फक्त फार्माच नव्हे तर डेअरी, अन्न आणि टिश्यू कल्चरचाही त्यात समावेश आहे. या पारंपारिक पद्धतीने कल्चर मिडियाची विल्हेवाट लावण्यात येत होती. त्यावर संशोधन करण्यासाठी विवेकानंद महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र आणि मायक्रोबायलॉजी विभागातर्फे एक प्रकल्प राबविण्यात आला.
त्यासाठी सुरुवातीला महाविद्यालयाने निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार प्रयोगशाळेतील कचऱ्यावर विशिष्ट प्रक्रिया करून त्यापासून बायोगॅस आणि विजनिर्मिती करण्याचे तंत्र शोधुन काढले. हा प्रकल्प मागील तीन वर्षांपासून महाविद्यालयातसुरू आहे. या संशोधनाला भारत सरकारचे पेटंट मिळावे, यासाठी अर्ज सादर केला होता. त्या अर्जानुसार संशोधनाला २० वर्षांसाठीचे पेटंट जाहीर केले. त्याचे पत्र महाविद्यालयाला प्राप्त झाले आहे.