गौरवास्पद ! ‘देवगिरी’च्या सिद्धेशला ‘पंतप्रधान ध्वज‘ स्वीकारण्याचा मान; राज्याचा एनसीसीचा संघ सर्वोत्कृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2022 02:57 PM2022-01-29T14:57:33+5:302022-01-29T14:58:22+5:30
. राज्याच्या संघाने या रॅलीमध्ये सर्वोत्कृष्टतेचा पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर्स बँनर) पटकावला. हा ध्वज स्वीकारण्याचा मान सिद्धेशला मिळाला आहे.
औरंगाबाद : प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित प्रधानमंत्री रॅलीमध्ये महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) संघाने उत्कृष्ट कामगिरी करीत प्रथम पारितोषिक पटकावले. या संघातील देवगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी सिद्धेश आप्पासाहेब जाधव याला ‘प्राईम मिनिस्टर्स बॅनर’ (पंतप्रधान ध्वज) स्वीकारण्याचा मान मिळाला आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा मानाचा ध्वज स्वीकारला.
देवगिरी महाविद्यालयाच्या ५१ महाराष्ट्र बटालियन एनसीसी विभागाचा कॅडेट सिनियर अंडर ऑफिसर सिद्धेश जाधव याने दिल्ली येथे फिल्ड मार्शल करिअप्पा परेड मैदानावर शुक्रवारी (दि.२८) झालेल्या पीएम रॅली २०२२ मध्ये महाराष्ट्राच्या एनसीसी संघात सहभाग घेतला. राज्याच्या संघाने या रॅलीमध्ये सर्वोत्कृष्टतेचा पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर्स बँनर) पटकावला. हा ध्वज स्वीकारण्याचा मान सिद्धेशला मिळाला आहे. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्यासह लष्कर, हवाईदल आणि नौदलाचे प्रमुख उपस्थित हाेते. या संघामध्ये निवड होण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून शिबिर सुरू होते. या शिबिरात राज्यातील एनसीसी कॅडेट सहभागी झाले होते. त्यातून संघाची निवड करण्यात आली होती. नऊ जिल्ह्यांच्या औरंगाबाद एनसीसी विभागातन राज्याच्या संघात तीन कॅडेटची निवड झाली होती. त्यात सिद्धेशचा समावेश होता. देवगिरी महाविद्यालयात ११ वीपासून शिकत असून सध्या तो बीएस्सीच्या प्रथम वर्ष आणि एनसीसीच्या तृतीय वर्षात असताना त्याने हे यश मिळविले आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, क्रीडामंत्री सुनील केदार, ‘मशिप्रमं’चे सरचिटणीस आ. सतीश चव्हाण, प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, एनसीसीचे अधिकारी कॅप्टन डॉ. परशुराम बाचेवाड यांच्यासह महाविद्यायातील उपप्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.
हे यश अतुलनीय
देवगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी सिद्धेश याने मिळविलेले यश हे अतुलनीय आहे. देवगिरीसह इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. या यशाने त्याने देवगिरी महाविद्यालयाच्या लौकिकात भर घातली आहे.
- आ. सतीश चव्हाण, सरचिटणीस, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ