गौरवास्पद! विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 03:48 PM2024-10-19T15:48:23+5:302024-10-19T15:49:33+5:30

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नगरसेवक, महापौर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ते राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा असा चढता आलेख विजया रहाटकर यांचा राहीला आहे.

Glorious! Vijaya Rahatkar appointed as Chairperson of National Commission for Women | गौरवास्पद! विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

गौरवास्पद! विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर: भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने नियुक्ती केली आहे. रहाटकर यांनी यापूर्वी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही काम केले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या विजया रहाटकर पहिल्याच मराठी व्यक्ती ठरल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नगरसेवक, महापौर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ते राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा असा चढता आलेख रहाटकर यांचा राहीला आहे.

भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच विजया रहाटकर यांनी 2016 ते 2021 मध्ये महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिले. या कार्यकाळात त्यांनी "सक्षमा", "प्रज्ज्वला", "सुहिता" यांसारखे महिला केंद्रित अनेक यशस्वी उपक्रम राबवले. संवैधानिक दर्जा असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाला अत्यंत व्यापक अधिकार असून केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे.‌ भौतिक शास्त्रात पदवी आणि इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विजया रहाटकर यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यामध्ये 'विधिलिखित' या महिलांच्या कायदेविषयक पुस्तक मालिकेचे संपादन , 'अग्निशिखा धडाडू द्या', 'औरंगाबाद : लीडिंग टू वाईड रोड्स', 'मॅजिक ऑफ ब्लू फ्लेम' यांचा समावेश आहे. महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रीय कायदा पुरस्कार, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले आहे.

राज्य महिला आयोगात भरीव कार्य
रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविताना भरीव कार्य केले आहे. "सक्षमा" उपक्रमा मधून ऍसिड हल्ला पीडितांना दिलासा दिला. प्रज्ज्वला योजनेतून केंद्र सरकारच्या योजनांशी लाखो महिलांना जोडून घेतले. सुहिता योजनेतून महिलांना 24×7 हेल्पलाइन उपलब्ध करून दिली. निर्मल वारी योजनेतून लाखो महिला वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. महिला केंद्रित विकास आणि महिला नेतृत्वाखाली विकास या संकल्पनांना कायदेशीर सुधारणांचा आधार मिळावा यासाठी वेगवेगळ्या सुधारणा सुचविल्या. त्यात पोस्को सेल, ट्रिपल तलाक सेल, तसेच मानवी तस्करी विरोधात विशेष सेलची निर्मिती यांचा समावेश आहे. डिजिटल लिट्रसी, महिला आयोग आपल्या दारी, महिला आयोगाचे "साद" नियतकालिक यासारखे उपक्रम देखील घेतले. 

भाजपामध्ये महत्वाच्या पदांवर काम
नगरसेवक, महापौर अशा जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या विजया रहाटकर यांनी राज्य आणि देश पातळीवर भाजपामध्ये लक्षणीय काम केले आहे. महाराष्ट्र भाजप युवा मोर्च्याच्या उपाध्यक्ष ते भाजप महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. त्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या प्रदीर्घकाळ सदस्यादेखील राहिल्या आहेत. सध्या त्या राजस्थान भाजपच्या सहप्रभारी म्हणून पक्षाचे काम करीत आहेत. राजस्थान विधानसभेमध्ये भाजपने मिळविलेल्या यशामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. 

महिलांच्या नेतृत्वाखाली विकासयात्रेला चालना देणार
राष्ट्रीय महिला आयोगासारख्या संवैधानिक संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार. या महत्वपूर्ण जबाबदारीचे पालन मी निष्ठेने आणि समर्पण भावनेने करेन. शिक्षण, आरोग्य, सामाजिक स्थान यासारख्या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे महिलांच्या क्षमतांना आणि संधींना अधिक गती देण्याचा प्रयत्न करेन. केवळ महिला सक्षमीकरण एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता, महिलांच्या नेतृत्वाखाली विकासयात्रेला चालना देण्याचा माझा प्रयत्न राहील."
- विजया रहाटकर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या नूतन अध्यक्ष

Web Title: Glorious! Vijaya Rahatkar appointed as Chairperson of National Commission for Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.