मद्यपीचा प्रताप ! रॉंग साईड जाणाऱ्या सुसाट कारमुळे अनेकांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 05:01 PM2021-01-21T17:01:05+5:302021-01-21T17:04:22+5:30
बीडीडीएसच्या पोलिसांनी त्याला कारसह एमआयडीसी सिडको पोलिसाच्या ताब्यात दिले.
औरंगाबाद: मद्यपी चालक काय करतील याचा अंदाज बांधणे कठीण असते. अशाच एका चालकाने बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास वसंतराव नाईक चौक ते सिडको बसस्थानक दरम्यान रॉंग साईड नेल्याने समोरून येणाऱ्या अनेक वाहनासोबतचा अपघात होता होता टळले . हा प्रकार पाहताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या पोलिसांनी नागरीकांच्या मदतीने पाठलाग करून कारचालकाला पकडून एम आय डी सी सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले.
गुरुवारी रात्र ११ वाजेच्या सुमारास जळगांव रोडवर नेहमीप्रमाणे वाहतूक सुरळीतपणे सुरू होती. याचवेळी बॉम्ब शोधक आणि नाशकचे पथक सिडको बसस्थानकाची तपासणी करून बसस्थांकातून बाहेर पडले. तेव्हा त्यांच्यासमोर एस टी बस, कार आणि अन्य दुचाकी होत्या. एक जण कार (क्रमांक एम एच २० एफपी ४९७७) घेऊन अचानक वसंतराव नाईक चौकाकडुन (जळगांव टी )हर्सुल टी पॉईंटकडे जाण्यासाठी रॉंग साईडने आल्याचे वाहनचालकानी पाहिले. याचवेळी सिडको बसस्थानकातून बाहेर पडलेल्या बससोबत कारची धडक होण्याची शक्यता लक्षात घेऊन बस चालकाने बस चा वेग कमी केला. ही बाब दिसताच प्रत्यक्षदर्शी नागरीक आणि बॉंब शोधक आणि नाशक पथकाचे जवान सोनवणे, लोखंडे आणि अन्य पोलिसांनी रॉंगसाईड कारच्या दिशेने धाव घेतली.
यावेळी त्यांनी चालकाला कार थांबविण्याचे सांगितले. मात्र चालकाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि न थांबता तो सुसाट जाऊ लागला. यामुळे आणखी काही अंतर पायी पाठलाग करून सिडको पोलीस ठाण्यासमोर त्याला पकडण्यात आले. तेव्हाही तो कारमधून उतरत नव्हता. उलट कुणाला तरी मोबाईलवर कॉल करीत होता. नागरीक आणि पोलिसांनी त्यांच्या कार समोर उभे राहुन रोखले. कुणीतरी त्यांना स्टेअरिंगवरुन बाजुला केले आणि कार रस्त्यावरून बाजुला नेली. यानंतर याघटनेची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना कळविण्यात आले. बीडीडीएसच्या पोलिसांनी त्याला कारसह एम आय डीसी सिडको पोलिसाच्या ताब्यात दिले.
त्या कारचालकाला दिले सोडून
बॉंब शोधक आणि नाशक पथकांतील पोलीस कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शी नागरीकांनी पाठलाग करून कार पकडलेल्या कारचालकाला एम आय डी सी सिडको पोलिसांच्या स्वाधीन केल्यावर कुणीही त्यांच्यावर तक्रार नोंदविली नाही. यामुळे त्याला रात्रीच पोलिसांनी सोडून दिल्याचे समजले.